बुलढाणा (संजय निकाळजे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने गेल्या दहा वर्षांमध्ये एकही आंदोलन नाही, निवेदन नाही. फक्त निवडणूक आली की, नेहमीचे तेच चार, पाच कार्यकर्ते घेवून बैठक घेतली जाते. सेल्फी काढून प्रसिद्धी केली जाते, त्यामुळे रिपाइंला मित्र पक्षात व प्रशासनात कोणतीही किंमत उरलेली नाही. मित्र पक्ष निवडणुकीत दहा दिवस मानसन्माने वागविते. मात्र बाकीचे दिवस रिपाइं कार्यकर्त्यांना मित्र पक्षाकडून सपत्नीक वागणूक मिळते. अशी दयनीय अवस्था जिल्हयात रिपाइंची झाली असून, जिल्ह्यातील स्वयंघोषित नेत्याने रिपाइंची वाताहात केल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो निष्ठावंतांनी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समक्ष केला.
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे २८ मे २०२३ रोजी शिर्डी येथे भव्य अधिवेशन पार पडले. या अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते गेले होते. त्यामध्ये जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, बुलडाणा जिल्हा उत्तरचे (घाटाखालील) नेते भाऊसाहेब सरदार, बुलडाणा जिल्हा युवा दक्षिण (घाटावरील) नेते इंजिनिअर शरद खरात, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई वानखडे, जेष्ठ नेते मुरलीधर गवई, विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे, संजय.वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिपाइं कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, रिपाइंचे केंद्रीय कार्याध्यक्ष बाबूराव कदम, विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.
तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न असून, त्यामध्ये शेतकरी, अतिक्रमणधारक, भूमिहीन, शेतमजुरांचे प्रश्न घरकुलाच्या समस्या व अडचणी आहेत. मात्र त्यावर प्रशासनास कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येत नाही. तर अधिकार्यांना निवेदन देण्यात येत नाही. गेल्या दहा वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये चुलत्या-पुतण्याची रिपाइं न राहता रामदास आठवलेंच्या आक्रमक स्वाभिमानी विचार धारेची सक्षम रिपाइं उभी करावयाची असल्यास आजचे नेतृत्व बदलण्याची काळाजी गरज आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर रामदास आठवले, राजाभाऊ सरोदे, मोहन भोयर, बाबुराव कदम यांनी लवकरच बुलडाणा जिल्ह्याच्या नेतृत्वाचा बदल करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.