Breaking newsHead linesPachhim Maharashtra

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’!

नगर (जिल्हा प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे जाहीर सभेत जाहीर केले. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाईल. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींची २९८ वी जयंती चौंडी येथे साजरी झाली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अहिल्यानगर असे नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे. तसेच हे नामांतर झाल्यामुळे नगर जिल्ह्याचा मानदेखील हिमालयाएवढा होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने अहमदनगरच्या नामांतरची घोषणा केली. या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे असून, आता या जिल्ह्याचा मानदेखील हिमालयाएवढा होणार आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे आम्ही आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालो हे आमचे भाग्य समजतो. ज्या लोकांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही २० दिवसात सत्तेतून घालवण्याचे काम केले, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहितदादा पवार यांना लगावला.

नगरचे नामांतर हा राजकीय मुद्दा चांगलाच पेटलेला असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात यासंदर्भात मागणी करताना सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार या नामांतराबाबत सकारात्मक असून, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्तावदेखील मागवले आहेत, अशी माहिती दिली होती. यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरु असून, जिल्हाधिकार्‍यांमार्फत मनपाकडून ठरावाची प्रतदेखील मागवली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, १५व्या शतकाच्या अखेरीस निजामशाहा मलिक अहमद बहिरी याने बिदरचा सेनापती जहांगीर खानचा याचा पराभव केला. आताच्या अहमदनगरजवळील भिंगार येथे जिंकलेल्या युद्धाचा आनंद साजरा करताना मलिक अहमदने भुईकोट किल्ला उभारण्याचा आणि त्याच्याजवळ शहर वसवण्याचा निर्णय घेतला. २८ मे १४९० रोजी मलिक अहमदने येथे शहराची स्थापना केली आणि त्याला अहमदनगर असे नाव दिले. यंदा अहमदनगर शहराच्या स्थापनेला ५३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर हे नाव मलिक अहमद याच्या नावावरूनच पडले आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1lDxLnozwevGm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!