मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडून शिक्षण विभागासह शासनाची फसवणुक करणार्या शिक्षकांच्या बनावट प्रमाणपत्राऐवजी त्यांची शारीरिक दिव्यांगाची तपासणी करण्यात यावी. असे केल्यास सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडलेल्या शिक्षकांचे पितळ ऊघडे पडेल.
अशा बनावट प्रमाणपत्रांमुळे बदली प्रक्रियेत अशा शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार प्रथम प्राधान्य दिले जाते, व त्यांना त्याच्या सोयीनुसार बदली मिळते व त्यांना कुठलेही शासकिय कामे सांगता येत नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून जिल्हा परिषद शिक्षण विभागात सादर केलेली आहेत. तसेच शिक्षकांनी सादर केलेले बनावट प्रमाणपत्र न तपासता त्यांची शारीरीक तपासणी करून ते स्वत: दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पाल्य दिव्यांग आहेत का, याची तपासणी करावी. अस्थीव्यंग, कर्णबधीर, दुर्धर आजार अशाप्रकारचे बनावट प्रमाणपत्र अनेक शिक्षकांनी सादर केलेले आहेत. यामुळे खर्या दिव्यांग असलेल्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. त्याच बरोबर शिक्षण सेवेचे प्रामाणिक काम करणार्या शिक्षकांचे मनोधर्य खचत आहे व याचे परिणाम त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होत आहे.
तरी सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील दिव्यांग्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून कार्यरत असलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा यांचेकडे ग्राहक ऊपभोक्ता संरक्षण समितीने निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे पदाधिकारी सचिन खंडारे, सुनिल अंभोरे, डॉ.गंगाराम ऊबाळे, कैलास आंधळे, बबन सरकटे, ज्ञानदेव वायाळ यांच्या सह्या आहेत.