– आज दुपारपासून वरोरा येथे अंत्यदर्शन, उद्या सकाळी ११ वाजता अंत्यविधी
चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव तथा चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे रात्री साडेतीन वाजता नवी दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते अवघ्या ४८ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथील निवासस्थानी आज दुपारी १.३० वाजता आणण्यात येणार आहे. दुपारी २ वाजेपासून ३१ मेरोजी सकाळी १० वाजेपर्यंत ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मेरोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचा धक्का त्यांना असह्य झाला. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर धानोरकर कुटुंबावर कोसळला आहे.
बाळू धानोरकर यांचा २०१९ लोकसभा निवडणुकीत विजय झाला होता. धानोरकर यांनी तेव्हा भाजप दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. मोदी लाटेतही महाराष्ट्रातून काँग्रेसचे जिंकलेले एकमेव खासदार अशी त्यांची ओळख होती. खा. धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. शुक्रवार, २६ मेरोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दिल्लीतील मेदांता रुग्णालयात पहाटे ३ वाजून ३० मिनिटानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म ४ जून १९७५ ला यवतमाळ जिल्ह्यात झाला होता.
महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार आणि कोणत्याही आव्हानाशी दोन हात तयार करायला तयार असणारा जीगरबाज नेता अशी बाळू धानोरकर यांची ओळख होती. अनेक चढउतारांनी भरलेला त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक असा राहिलेला आहे. स्वत:च्या कुवतीवर प्रचंड आत्मविश्वास असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यामुळेच की काय, बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही लढायची तयारी दाखवली होती. ‘पक्षाने आदेश द्यावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’, हे त्यांचे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. भाजप ही आमची पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प हद्दपार झाले. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले होते.
राहुल गांधींनी फेसबूक पोस्ट करत लिहिलं आहे की, “महाराष्ट्रातील चंद्रपूरचे खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते श्री सुरेश नारायण धानोरकर यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा धानोरकर आणि संपूर्ण शोलेकुल परिवाराप्रती मी भावपूर्ण शोक व्यक्त करतो. ते कायम आमच्या आठवणीत जिवंत राहतील.”
खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत अशोक चव्हानांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दुर्गम भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो.
तळागाळातील नेते होते – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
महाराष्ट्रातील चंद्रपूर काँग्रेसचे खासदार सुरेश नारायण धानोरकर यांच्या अकाली निधनाची बातमी कळताच दु:ख झाले. ते तळागाळातील नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि कार्यकर्त्यांप्रती आमची तीव्र संवेदना. त्यांना हे नुकसान भरून काढण्याचे बळ मिळो.
लढवय्या लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चंद्रपूर वरोरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एक तरुण, तडफदार आणि लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गमावला- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चंद्रपूर जिल्ह्याने जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक नेता गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
महाविकास आघाडीची मोठी हानी – विरोधी पक्षनेते अजित पवार
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.