Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

भूकंपाने सोलापूर हादरले!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूरला सौम्य भूकंपाचा धक्का बसला असून, रिश्टर स्केलवर त्यांची १.३ इतकी नोंद झाली आहे. सोलापूर शहराच्या दक्षिणेला १४ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा भूकंप झाला. तर तब्बल १७ गावांत गूढ आवाज आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, निंबर्गी, कंदलगाव, वांगी, विंचूर, १३ मैल, कुरघोट, माळकवठा, येळेगाव, आचेगाव, होटगी स्टेशन, हिपळे, फताटेवाडी, औज आहेरवाडी, तिल्हेहाळ, कणबस व बोरूळ या गावांत भूकंपाच्या धक्क्याची जाणीव झाली. कोठेही वित्त व जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिली. त्यानंतर रात्री पाऊस व वादळ झाल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले होते.

सोलापूर विद्यापीठातील भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटरच्या भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली असून, सोलापूर शहराच्या दक्षिणेला १४ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र होते. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी केले आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूकंप मापन केंद्राचे संचालन भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरद्वारे होते. याबाबत अधिकृत माहिती मुख्य केंद्रात संकलित होते. विद्यापीठाने या केंद्रासाठी केवळ सुविधा दिली आहे. परिसरातील ३०० किलोमीटर परिघातील भूगर्भातील हालचालींची नोंद होते. तीन रिश्टर स्केलपर्यंत नोंद असलेल्या हालचाली या सौम्य मानल्या जातात, अशी माहिती या केंद्राचे संचालक प्रा. डॉ. धवल कुलकर्णी यांनी दिली आहे. कालचा भूकंप हा १.३ रिश्टर स्केल क्षमतेचा असल्याचे त्यांनी सांगितले. या भूकंपानंतर रात्री दहाच्या सुमारास विजापूर रोड, आरटीओ कार्यालय परिसर, जुळे सोलापुरातील काही भागांत वादळी वार्‍यासह पाऊस पडला.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!