BULDHANAVidharbha

बैलगाडी मोर्चाने शेकडो शेतकरी रणरणत्या उन्हात सिंदखेडराजा तहसीलवर धडकले!

– मागण्या मान्य न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्काराचा शेतकर्‍यांचा इशारा!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – रोहीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, अद्याप शेतकर्‍्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. रोह्यांचा त्रास व त्यावर वनप्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी भरदुपारच्या रणरणत्या उन्हात शेतकर्‍यांनी बैलगाडी मोर्चा काढत, मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा राज्य सरकारला तहसीलदारांमार्फत दिला. यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या लखोजीराजे जाधव राजवाडा येथे काहीवेळ धरणे आंदोलनदेखील करण्यात आले होते.

शेतशिवारात रोह्यांचा अतोनात त्रास वाढला असून, शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर महसूल व वन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. रोह्यांचा त्रास असलेल्या वनविभागाच्या भागात तार कुंपण करावे, नुकसान पंचनामे त्वरित करावेत, नुकसान भरपाई देता येत नसल्यास कुंपणसाठी शेतकर्‍यांना ९० टक्के अनुदान द्यावे, बँकेने शेतकर्‍यांच्या खात्याला लावलेले होल्ड त्वरित काढावे, आदी मागण्यासाठी शहर व तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारादेखील मोर्चेकर्‍यांनी दिला आहे.

यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये दिलीप चौधरी, अक्षय ठाकरे, कैलास मेहेत्रे, सखाराम चौधरी, शहाजी चौधरी, सिद्धार्थ जाधव, अनिल मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, दत्ता चौधरी, अनिल जावळे, भिकाजी खार्दे, कैलास येडुबा मेहेत्रे, नरहरी तायडे, गजानन मेहेत्रे, सखाराम बर्डे, संजय तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाने सिंदखेडराजा नगरी दणाणून गेली होती.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!