Breaking newsBuldanaHead linesMaharashtraVidharbha

हिवरा आश्रम जळीतकांड; आमदार संजय रायमुलकर यांच्याकडून विनोद पटेल यांना जागच्या जागी ५० हजाराची रोख मदत!

– मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरघोस मदत मिळवून देण्याची आ. रायमुलकर यांची ग्वाही

हिवरा आश्रम, ता. मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र) : येथील तरुण व कल्पक शास्त्रज्ञ विनोद शंकरलाल पटेल (वय ४१) यांच्या आशापुरा वर्कशॉपला मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागून, त्यांनी संशोधित केलेली उपकरणे, वाहने, स्पेअरपार्ट आणि यंत्रांचे सुटे भाग जळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले होते. आगीने या तरुण संशोधकाचे स्वप्नच जळून खाक केले आहे. तरीही, त्यांना सावरण्यासाठी अनेक हात पुढे आले असून, आज (दि.७) सकाळी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी पटेल यांच्या वर्कशॉपला भेट देऊन पाहणी केली, व जागच्याजागी ५० हजारांची मदत दिली. नुकसान मोठे असले तरी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार रायमुलकर यांनी विनोद पटेल व त्यांचे वडिल शंकरलाल पटेल यांना दिली आहे. आमदारांना पाहून विनोद पटेल यांना आपले आश्रू अनावर झाले. ते ओक्साबोक्सी रडू लागले. त्यांच्या वडिलांच्याही डोळ्यात दाटलेले पाणी पाहून उपस्थित सर्वांची मने हेलावून गेली होती.
दिनांक ५ जुलैच्या रात्री हिवरा आश्रम येथील आशापुरा वर्कशॉपला शॉर्टसर्किटने आग लागली होती. या भीषण अग्निकांडात विनोद पटेल या तरुण संशोधकांच्या संशोधित प्रत्येक वस्तू, दोन चारचाकी वाहने, स्पेअरपार्ट, यंत्रांचे सुटे भाग व इतर साहित्य जळून खाक झाले होते. जवळपास ५० लाखांचे नुकसान झालेले आहे. विनोद पटेल हे दिव्यांग असून, त्यांना संशोधनाची उपजत बुद्धी आहे. त्यांनी टाकावू वस्तूपासून विविध यंत्रे, उपकरणे तयार केली आहेत. वीजनिर्मिती करणारे जनित्रदेखील त्यांनी टाकावू वस्तूपासून तयार केले होते. त्यांच्या संशोधनामुळे ग्रामीण भागात त्यांना आधुनिक ‘रांचो’ असे म्हटले जाते.
या दुर्देवी घटनेची माहिती कळल्यानंतर, आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी आज सकाळी हिवरा आश्रम येथे धाव घेतली व जळालेल्या वर्कशॉपची पाहणी केली. नुकसान मोठे असले तरी, मुख्यमंत्री सहाय्यता निधातून मदत दिली जाईल, व दिव्यांग असलेल्या विनोद पटेल यांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे करता येईल, असे सांगून आमदार रायमुलकर यांनी जागच्या जागी ५० हजाराची स्वतःतर्फे रोखस्वरुपात मदत दिली. आमदारांना पाहून विनोद पटेल व त्यांचे वडिल शंकरलाल पटेल यांना आपले आश्रू रोखता आले नाही. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेले मान्यवरदेखील हेलावून गेले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनिष शेळके, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, महाराष्ट्र अर्बनचे माजी अध्यक्ष बबनराव भोसले, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, तलाठी राहुल मोहिते, ग्रामसेवक सदाशिव म्हस्के, तलाठी पी. आर. रहाटे, उपसरपंच रमेश गिरी, मंचकराव देशमुख, अमोल म्हस्के, बंडू धोंडगे, नागेश कुसळकर आदींची उपस्थिती होती.

महसूल प्रशासनाने केला पंचनामा
या जळीतकांडाचा पंचनामा महसूल प्रशासनाने आज केला. मेहकरचे नायब तहसीलदार अजय पिंपरकर व तलाठ्यांनी हा पंचनामा करून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल लवकरच तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची घोषणा आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी केलेली आहे. त्यादृष्टीने जळीत घटनेचे सर्वसाधारण निकष न लावता भरघोष मदत देण्याची मागणी पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!