Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

माजी खासदार आनंदराव अडसूळही बंडखोरीच्या मार्गावर!

– शिवसेना खासदारांतही आता दोन गट
बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिवसेनेचे माजी खासदार तथा नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या शिवसेना पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून, तेदेखील बंडखोरीच्या मार्गावर असल्याचे शिवसेनेच्या अंतर्गत सूत्राने सांगितले आहे. अडसूळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाऊ शकतात, असेही हे सूत्र म्हणाले.
शिवसेना पक्षात सद्या अंतर्गत बंडाळी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक भलामोठा गट शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचे शिवसेना म्हणूनच अस्तित्व निर्माण करत आहे. त्यातच काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील पक्षप्रतोद खासदार भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवले होते, त्यामुळे खासदारांमध्येही दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्यासोबत राहण्याचा आग्रह धरत आहे. त्यातच, काल शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपावला आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठीशी न राहल्याचा आरोप अडसूळ यांना ठाकरे यांच्यावर केला आहे. ईडीने केलेली कारवाई व आजारपणात पक्षाने आपली साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत अडसूळ यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत.
आनंदराव अडसूळ हे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय व निष्ठावंत मानले जात होते. स्व. बाळासाहेबांनी अडसूळ यांच्यासाठी बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडून खास मागवून घेतला होता. तेथे त्यांनी काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांचा पराभव करत, विजय मिळवला होता. बुलडाणा मतदारसंघ खुला झाल्यानंतर अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून राखीव जागेवर खासदार झाले होते. मागील निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने त्यांचा पराभव केला होता.

शहर बँकेत अनियमितता प्रकरणी आनंदरराव अडसूळ यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, आजारपणाचे कारण देत, अडसूळ हे चौकशीला गेले नव्हते. तरीही अडसूळ यांना ताब्यात घेण्यासाठी ईडीचे अधिकारी तब्बल १४ तास हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून बसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!