बुलढाणा (गणेश निकम) – ऐतिहासिक वारसा असलेल्या ५२ बुरुजी अर्थात करवंड येथील प्राचीन वास्तूंचे जतन – संवर्धन करून गावाला प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी सुनील जवंजाळ पाटील यांच्यासह शिवप्रेमींनी केली आहे. तर सिंदखेडराजाप्रमाणे शिव इतिहास लाभलेले करवंडचा इतिहास पुढे आणण्यासाठी समाज धुरिणांनी पुढे यावे, असे आवाहन कर्नाटक तंजावार येथील इंगळे सरदार घराण्याचे वारस हरिरुद्रराजे इंगळे यांनी केले आहे.
नुकतीच शिवप्रेमींनी करवंड येथे भेट देऊन येथील बारव, वाडा, प्रचंड आकाराची बावनबुरुज असणारी किल्ले वजा गढी, मंदिरे यांना भेट दिली. यावेळी इंगळे घराण्याचे हरिरुद्र राजे उपस्थित होते. सिंदखेडराजा आणि करवंड या गावांचा इतिहास शिवरायांशी जोडला जातो. सिंदखेडराजा जिजाऊंचे माहेर तर करवंड शिवाजी महाराज यांच्या पत्नी गुणवंतबाई यांचे माहेर आहे. त्या इंगळे घराण्यातील होत्या. महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे यांनादेखील याच घराण्यातील दीपाबाई साहेब यांना दिले गेले. मात्र सिंदखेडराजा जसे चीरपरिचित झाले तसे करवड दुर्लक्षित राहिले. इतिहासकारांनी करवंडकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मराठा सोयरीकचे संस्थापक व मराठा समाजातील सक्रिय व्यक्तीत्त्व सुनील जंवजाळ यांनी केले. प्राचीन वास्तूमध्येच शिवप्रेमींनी एक बैठक घेतली, यावेळी सुनीलभाऊ जवंजाळ, जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. अशोकराव खरात, अरविंदबापू देशमुख, पत्रकार गणेश निकम, डॉ.संजीवनी शेळके, सुरेखाताई सावळे, दिनकरराव बावस्कर, पत्रकार श्यामभाऊ गुजर, दिलीपराव हेलगे, करवंड येथील सरपंच सुर्वे व गावकरी आदी उपस्थित होते.
५२ बुरुजांचे करवंड
स्वराज्य निर्मितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील इंगळे सरदारांचा मोठा वाटा राहिला आहे. पानिपतच्या लढाईत इंगळे सरदारांनी पराक्रम गाजविला. करवंड येथे किल्ल्यासारखी प्रचंड मोठी गडी आजही आहे. मात्र येथील पुरातन अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी गुणवंताबाई जयंती महोत्सव सुरू करून जिजाऊसृष्टी प्रमाणे शिव इतिहास जतन करण्यासाठी शिवप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.
मद्रासला मराठा मेळावा
तामिळनाडू परिसरात सात लाख मराठा कुटुंब वास्तव्यास आहेत, असे राजे हरीरुद्र यांच्याशी चर्चा करताना कळाले. या ठिकाणी समाज बांधवांना संघटित करून त्यांचे संबंध महाराष्ट्राशी जोडण्यासाठी डॉक्टर संजीवनी शेळके यांच्या नेतृत्वात शिवप्रेमींची एक टीम मद्रासला जात आहे. हरियाणाप्रमाणे तामिळनाडू येथेही मराठा मेळाव्याचे आयोजन हरीरुद्र राजे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
————-