पश्चिम विदर्भासाठी नाफेड़ला हरभरा खरेदीचे ५ लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शासनाकड़ून पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी नाफेड़ला अतिरिक्त पाच लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातूनही दीड़ लाख क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. चालू हंगामात शासनाच्या ५ हजार ३३५ रूपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने नाफेड़मार्फत हरभरा खरेदी सुरू आहे. बाजारपेठेच्या तुलनेत भावात मोठी तफावत असल्याने शेतकर्यांचा कल सहाजिकच नाफेड़कड़े आहे.
सुरूवातीला दिलेले उद्दिष्ट लवकर पूर्ण झाल्याने शासनाकड़ून एप्रिल महिन्यात टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगत, बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा खरेदी एकाएकी बंद करण्यात आली. परिणामी, खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागून होत्या. खरेदीअभावी नोंदणी केलेले शेतकरी चिंतेत पड़ले होते तर काही दिवस खरेदीदेखील बंद होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त प्रसारित करताच शासन खडबडून जागे झाले. याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली होती. सदर वृत्ताची प्रशासकीय पातळीवर देखील गंभीर दखल घेण्यात येवून जिल्ह्यासाठी नाफेड़ला दीड़ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून, जिल्ह्यात आठ ते नऊ एजन्सी मार्फत हरभरा खरेदी सुरू आहे. परंतु कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी निश्चित केलेले खरेदीचे २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यातील शिल्लक राहणारे उद्दिष्ट अन्य वाढीव उद्दिष्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांना तसेच ज्या जिल्ह्याचे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट २५ टक्केच्या प्रमाणात पूर्ण होणार आहे, अशा जिल्ह्यांना हरभरा खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट देण्यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव सहकार व पणन यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व स्टेटस नोड़ल एजन्सीज यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे १८ मे रोजी घेण्यात आली.
ज्यांच्याकड़ून हरभरा खरेदी शिल्लक आहे, अशा उर्वरीत शेतकर्यांच्या संख्येच्या प्रमाणात जिल्हानिहाय हरभरा खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट यावेळी निश्चित करण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्हा दीड लाख क्विंटल, अकोला एक लाख क्विंटल, अमरावती दीड लाख क्विंटल, यवतमाळ ७० हजार क्विंटल, वाशिम ३० हजार क्विंटल यासह जळगाव ५० हजार व लातूर जिल्ह्यासाठी ५० हजार क्विंटलचे अतिरिक्त वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे यांनी २२ मेरोजी जारी केला आहे.
खामगाव खरेदी केंद्रावर व्यापार्यांचा बोलबाला?
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील खरेदी विक्री संस्था येथील हरभरा खरेदी केंद्रावर व्यापार्यांचाच बोलबाला असल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील कंचनपूर येथील शेतकरी प्रवीण ढोरे यांनी चार दिवसापूर्वीच केला होता. शेतकर्यांना मागे ठेवत व्यापार्यांचा माल शेतकर्यांच्या नावावर खरेदी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. आपण चार दिवस ‘खुट्या’ भरून बेजार झालो, अशी आपबितीही त्यांनी याबाबतच्या व्हायरल व्हिडिओत कथन केली होती. यामुळे प्रशासनात एकच खळखळ उड़ाली व प्रवीण ढोरेसह इतरांचा २७ क्विंटल हरभरा तात्काळ मोजून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आता मात्र खरेदी सुरळीत सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. असाच काहीसा प्रकार इतरही काही खरेदी केंद्रावर होत असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.