तब्बल ७५ वर्षानंतर राजदंड (सेंगोल) संसदेत!
– नव्या संसद भवनाचे विधिवत देशार्पण
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – इंग्रजांकडून देशाची सत्ता हातात घेताना सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक ठरलेला राजदंड (सेंगोल) तब्बल ७५ वर्षानंतर देशाच्या नव्या संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला हिंदू रितीरिवाजानुसार स्थापन झाला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा राजदंड इंग्रजांकडून स्वीकारला होता. परंतु, मॉडर्न इंडियाची पायाभरणी करत असताना, हा राजदंड म्युझिअममध्ये होता. आता तो संसदेत अध्यक्षांच्या बाजूला स्थापित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संसदेच्या नव्या भवनाचे (सेंट्रल व्हिस्टा) शानदार व विधिवत देशार्पण झाले. हे देशार्पण राष्ट्रपतींच्याहस्ते व्हावे, अशी मागणी करणार्या तब्बल २० राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. तर, मोदी हे देशार्पण सोहळ्याला स्वतःचा राज्याभिषेक समजत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नव्या भवनाचे उद्घाटन करत, ते देशाला अर्पण केले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर पूजा, होमहवन आणि विधिवत त्यांनी संसद भवनाचे देशार्पण करत, सत्ता हस्तांतरणाचा प्रतिक ठरलेला राजदंड (सेंगोल) नव्या लोकसभा भवनात अध्यक्षांच्या बाजूला स्थापित केला. याप्रसंगी ही भव्यदिव्य इमारत उभी करणार्या कारागिरांचाही सन्मान मोदी यांनी केला. महान चोल साम्राज्यामध्ये सेंगोल को कर्तव्यपथ, सेवापथ, राष्ट्र पथाचे प्रतिक मानले जात होते. या सेंगोलचा सन्मान परत आणण्याचे सद्भाग्य लाभले, जेव्हा संसदेची कार्यवाही सुरू होईल तेव्हा आपणा सर्वांसमोर हा सेंगोल प्रेरणा देण्याचे काम करत राहील, असे पंतप्रधान मोदी याप्रसंगी म्हणाले.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आलं नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. यावरून देशभरातील २० पक्षांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असं म्हणत विरोधकांनी संयुक्त निवेदन जारी करून बहिष्कार जाहीर केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. तर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत,’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर नव्या लोकसभेतून संबोधित केलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिंवश उपस्थित होते. प्रत्येक देशाच्या विकासाच्या यात्रेत काही क्षण येतात ते अमर होतात. काही तारखा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवल्या जातात, तसा क्षण आजचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपला देश स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानिमित्त अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताच्या लोकांनी लोकशाहीला या निमित्तानं संसदेची भेट दिली आहे. आज सकाळी ससंदेच्या प्रांगणात सर्वधर्मीय प्रार्थना झाली आहे. सर्व देशवासियांना या सुवर्ण क्षणांच्या शुभेच्छा देतोय, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मुंबई: नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला गेलो नाही, याबद्दल मला समाधान वाटत आहे. कारण, त्याठिकाणी ज्या लोकांची उपस्थिती होती, जे काही धर्मकांड सुरु होतं, ते पाहिल्यानंतर या सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयाबद्दल मला समाधान वाटले, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती आणि आज संसदेत जे काही चाललंय त्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्षे पाठीमागे नेतोय का, याची चिंता वाटायला लागली आहे. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाजाची संकल्पना मांडली होती, त्याच्या अगदी उलट चित्र आज संसदेत पाहायला मिळाले, असे शरद पवार यांनी म्हटले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आण्यात आली, याचे मला कौतुक वाटले, अशी उपरोधिक टिप्पणीही शरद पवार यांनी केली.
#WATCH | PM Modi installs the historic 'Sengol' near the Lok Sabha Speaker's chair in the new Parliament building pic.twitter.com/Tx8aOEMpYv
— ANI (@ANI) May 28, 2023