सायबर भामट्यांचा धक्कादायक प्रताप! वर्धा नागरी बँकेवर मारला तब्बल १ कोटी २१ लाखांचा डल्ला!!
वर्धा (प्रकाश कथले) – वर्धा येथे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामट्यांनी बँकेची युटिलिटी हॅक करीत तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी बँक व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने बँकिंग क्षेत्र हादरले आहे.
वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँक ही जिल्ह्यातील अग्रणी बँक असून, बर्याच नागरिकांची सदर बँकेत खाती आहेत. परंतु सदर बँकेकडे निफ्टी आणि आरटीजीएस प्रणालीची सुविधाच उपलब्ध नसल्याने याकरिता नागरी बँकेचे येस बँकेशी टाय-अप झाले आहे. येस बँकेच्या खात्यातूनच वर्धा नागरी बँकेचे आरटीजीएस व निफ्टीचे व्यवहार होत असतात. दरम्यान, बुधवार ता. २४ मे रोजी सकाळच्या सुमारास बँक बंद असताना सायबर भामट्यांनी येस बँकेची युटिलिटी हॅक करीत मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास केली. यात वर्धा नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम परस्पर इतर खात्यात वळती करण्यात आली.
बँकेच्या नियमित वेळात कर्मचार्यांनी जेव्हा बँक उघडली आणि संगणक आपरेट केले, तेव्हा कुठे सायबर भामट्यांनी केलेला प्रताप उजेडात आला. सायबर चोरट्यांनी सकाळी सहा वाजून सात मिनिटं ते आठ वाजून सव्वीस मिनिटांच्या काळात तब्बल २४ खात्यात सदर रक्कम वळती केल्याचे दिसून आले. परंतु यासंदर्भातील नोंदी कोअर बँकींग प्रणालीत दिसून आल्या नसल्याने येस बँकेची युटिलिटी हॅक करीत नागरी बँकेच्या खात्यातील रक्कम परस्पर वळती केल्याचे पुढे आले. याप्रकरणी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून अधिक तपास करीत आहेत.