नव्या जागावाटपात प्रतापराव जाधवांची जागा कायम राहणार!
– शिंदे गटाचे १३ खासदार पुन्हा शिवसेनेच्याच चिन्हावर लढण्यास सज्ज!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह मिळाले असल्याने विद्यमान या गटाचे शिवसेना खासदार हे पुन्हा त्याच निवडणूक चिन्हावर अर्थात धनुष्यबाण घेऊन लढणार असून, मागीलवेळी शिवसेनेला सोडण्यात आलेल्या २२ जागा भाजपकडे मागण्याची राजकीय रणनीती शिंदे गटाने आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत ही भूमिका निश्चित करण्यात आली आहे. तथापि, भाजपने या संदर्भात अद्याप काहीच भूमिका घेतललेली नसून, भाजपने ४८ मतदारसंघात आपले काम सुरू केले आहे. तथापि, शिंदे गटाला सद्या ज्या जागा आहेत, त्या जागा सोडण्याची स्ट्रॅटेजी भाजप आखणार असल्याची खात्रीशीर माहिती असून, तसे झालेच तर बुलढाण्याची जागा पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच सुटणार असून, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रा. नरेंद्र खेडेकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी नेते रविकांत तुपकर या दोघांपैकी एकाच्या विरोधात प्रतापराव जाधव यांचा सामना या मतदारसंघात रंगण्याचे संकेत असल्याची चर्चा राजधानी मुंबईत सुरू आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील ४८ मतदारसंघात आपले काम सुरू केले असून, प्रमुख पदाधिकार्यांवर विशेष जबाबदारी सोपवली गेली आहे. जनसंपर्क दौरे व विकासयात्रा काढली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी रा. स्व. संघाची कोर टीमदेखील कामाला लागली असून, स्वयंसेवकदेखील या कार्यात आपले योगदान देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी त्यांनी नुकतीच आपल्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला शिंदे गटाचे १३ खासदार हजर होते. मागील लोकसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १८ जागा जिंकल्या होत्या. या सर्वच्या सर्व म्हणजे २२ जागा भाजपकडे मागण्याची भूमिका या बैठकीत निश्चित करण्यात आलेली आहे. सद्या शिंदे यांच्याकडे १३ तर ठाकरे यांच्याकडे पाच खासदार आहेत.
मागील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना, रिपाइं आणि घटक पक्षांनी मिळून सर्व ४८ जागा लढल्या होत्या. त्यावेळी मोदी लाट राज्यात होती. त्या लाटेत ४८ पैकी ४१ जागा भाजप-शिवसेनेला मिळाल्यात. त्यात २३ भाजप तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला होता. आता राज्यात मोदी लाटेचा फारसा प्रभाव नसून, शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती आहे. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजप कामाला लागले असून, अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाने २२ जागा मागायचे ठरवले तरी, भाजप त्यांना प्रत्यक्षात किती जागा सोडणार? याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. तरीही शिंदे गटाकडे ज्या जागा आहेत, तेथे भाजपची ताकद नसेल तर त्या जागा शिंदे गटाला सोडण्याची स्ट्रॅटेजी भाजप आखत असल्याची खात्रीशीर माहिती असून, तसे झाले तर बुलढाण्याची जागा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे.
मूळच्या शिवसेनेची असलेली ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे खेचून आणण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठी घासाघीस करावी लागणार आहे. कारण, आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उभे करण्याची अंतर्गत रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चित झाली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तरीही महाआघाडीकडून कुणीही उभे राहिले तरी बुलढाण्याची जागा िंजकण्याचा पक्का इरादा मात्र महाविकास आघाडीत असून, त्यांना यावेळी वंचित बहुजन आघाडीची साथ मिळणार आहे. त्यामुळे बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरविरुद्ध प्रतापराव जाधव असा सामना निश्चित असल्याचे मानले जात आहे.