बुलढाणा (बाळू वानखेडे) – इयत्ता बारावीचा निकाल आज २४ मार्च रोजी दुपारी जाहीर झाला असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९२.६३ टक्के लागला आहे. निकालावरून नजर फिरवली असता, मुलींचा टक्का वाढताच असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातून परीक्षेला एकूण ३२ हजार ८७२ विद्यार्थी बसले होते. पैकी ३० हजार ४५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या या जिल्ह्यात जिजाऊंच्या लेकींनी बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यात बाजी मारली आहे. सर्वाधिक गुणदेखील मुलींनाच मिळालेले आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड़ळ पुणे यांनी आज २४ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९२.६३ टक्के लागला. यामध्ये जिल्ह्यातून १८ हजार २८३ मुले व १५ हजार ५८९ मुली परीक्षेला बसले होते. यामधून १६ हजार ६७२ मुले व १३ हजार ७८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.१८ टक्के असून, मुलींचे ९४.४५ टक्के आहे. शाखानिहाय निकाल पाहता, विज्ञान शाखेतून १८ हजार ०५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १७ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १० हजार १६७ मुले व ७ हजार ३०० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या शाखेचा निकाल ९६.७३ टक्के लागला आहे. कला शाखेतून ११ हजार ०६९ मुलांनी परीक्षा दिली पैकी ९ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ८६.४३ टक्के आहे. वाणिज्य शाखेतून २ हजार ८४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी २ हजार ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ९२.७१ इतकी आहे. याशिवाय, व्होकेशनल शाखेचा निकाल ८६.२४ टक्के आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी दिली. दरम्यान, मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथून ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना गोसावी यांनी बुलढाणा येथे झालेल्या प्रकाराची चौकशी केली गेली. या प्रकरणात ६ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यावर कार्यवाही होईल. परंतु विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवता येत नाही असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.
श्री औंढेश्वर विज्ञान महाविद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
– सायन्स कॉलेजचा सलग तिसर्यावर्षी १०० टक्के निकाल
चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – स्थानिक श्री औंढेश्वर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय अंढेराचा निकाल याहीवर्षी १०० टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राखली. तसेच कला शाखेतही उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत ९८ टक्के टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतून विजय गजानन सानप याने ८३.३३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. अभिषेक महादू आंधळे याने ८२.०० टक्के गुण मिळवून द्वितीय तर सोहन गजानन आंधळे याने ८०.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत अश्विनी राजेश तेजनकर हिने ८४.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कोमल नंदू सुरडकर हिने ८१.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर शीतल केशव हिंगणकर हिने ८०.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अरुण सानप, प्रा.दिलीप सानप, प्रा.आघाव सर, प्रा.पाटील सर, प्रा.इंगळे सर, प्रा.नागरे सर तसेच आपल्या आई-वडिलांना देतात. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—–