सोलापूर (संदीप येरवडे) – कोळा (ता. सांगोला) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून २ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले. मात्र दुसर्या टप्प्यातील काम सुरू करण्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या निधीची पूर्तता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पहिल्या टप्प्यातील करण्यात आलेल्या कामांमध्ये विशेषता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची उभारणी केलेली आहे. सध्या हे स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी १२.५ कोटी रुपयांची आवश्यकता असून दुसर्या टप्यातील कामासाठी ४.५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधीसाठी वारंवार जि.प. कडून निधीची मागणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी सांगितले.
आज सोलापूर मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौर्यावर येत आहेत. यावेळी सदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी मागणीचा प्रस्ताव व स्मारकाच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी जि.प. सोलापूर बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचे अॅड. देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे येणार्या काळात राहिलेला १० कोटींचा निधी हा या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी जर हा निधी दिला तर संपूर्ण आंबेडकर अनुयायांमध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल, व कोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने मुंबई येथील चैत्यभूमी व नागपूर येथील दिक्षाभूमी सारखेच पवित्र स्थान असल्याने ज्या आंबेडकरी अनुयायांना मुंबई किंवा नागपूर येथे जाणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी कोळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल व भविष्यात कोळे हे गाव सोलापूर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ बनेल, अशी आशा जि.प. सदस्य अॅड. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.