सिंदखेडराजा/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पंचावन्न वर्षीय शेतकरी व १९ वर्षीय तरूणाने एकाच दिवशी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदय हेलावणारी दुर्दैवी घटना आज, २४ मेरोजी सकाळी सिंदखेड़राजा तालुक्यातील शेंदुर्जन गावात उघड़कीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सिंदखेड़राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील विठ्ठल विश्वनाथ शिंगणे (वय ५५) यांनी टिनाच्या अँगलला दोरखंड़ाने गळफास घेतला. मृतक विठ्ठल शिंगणे यांच्या पश्चात पत्नीसह एक मुलगा व मुलगी आहे. येथीलच मयूर बाजीराव इंगळे (वय १९) याने गजानन बोंन्द्रे यांचे शेतातील लिंबाच्या झाड़ाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूर इंगळे याच्या पश्चात आई, एक बहीण व भाऊ असा परिवार आहे. दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकला नाही. मात्र दोघांच्या आत्महत्येने शेंदुर्जन गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक तपास साखरखेर्ड़ा ठाणेदार नंदकिशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोकॉ विनोद वैद्य, पोकॉ.रामदास वैराळ हे करीत आहेत.