Head linesLONAR

बस चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशाचे प्राण!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – पुणे ते मेहकर बसमध्ये छत्रपती संभाजीनगरहून मेहकरला जाणारे वयोवृद्ध प्रवासी यांना अचानक उष्माघाताचा झटका बसून ते बेशुद्ध झाल्याची घटना बिबी येथे वाहकाच्या लक्षात येताच, त्यांनी चालकास तातडीने माहिती दिली. त्यामुळे चालकाने सदर बस बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात वळवून त्या वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचविले.

पुणे ते मेहकर (क्रमांक एमएच १४ बीटी ४५४४) या बसमध्ये बिबीपर्यंत ६४ प्रवासी असल्याची माहिती वाहकाकडून मिळाली. संभाजी नगर येथून प्रवासी पंढरी नारायण जैतुळकर वय ६५ वर्ष राहणार जैतुळा, तालुका मेहकर हे ज्येष्ठ नागरिक एकटेच संभाजी नगरहून मेहकरपर्यंत प्रवास करीत असताना दिनांक २४ मे रोजी भरदुपारच्या वेळेत २.३० ते २.४५ वाजेच्या दरम्यान वाहक अनिल सदाशिव आद्रट यांना सदर प्रवाशास घबराट होत असल्याचे कळताच चालक रमेश जाधव यांना तातडीने बस दवाखान्याकडे घेण्याची सूचना केली व रमेश जाधव यांनी बिबी येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. रुग्णालयातील कर्मचारी अनंता पाटोळे, दत्तात्रेय खंडागळे ,सुरक्षा गार्ड यांनी ताबडतोब पेशंटला ट्रेचरवर घेऊन इमर्जन्सी रूममध्ये घेऊन डॉ. नम्रता पांडे यांनी प्रवासी पेशंटवर ताबडतोब प्रथोमउपचार करण्यास सुरुवात केली. शिला हिवाळे नर्स यांनी डॉक्टरांना सहकार्य केले व नातेवाईकांना फोन करून बोलावून पेशंटला नातेवाईकाच्या ताब्यात देऊन, पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. बसच्या चालक ,वाहकाच्या प्रसंगावधानामुळे जैतुळकर यांचे प्राण वाचले असल्याची चर्चा बसमधील प्रवासी करत असल्याचे दिसले.

बस प्रवास सवलतीमुळे वयोवृद्ध प्रवास करत आहेत. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात गर्मीचा त्रास त्यांना सहन होत नाही. बसण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे आसन क्षमतेचेच प्रवासी घ्यावेत. वातावरणानुसार चांगल्या सोयी सुविधांच्या बसेस उपलब्ध कराव्यात. बसची संख्या वाढवावी. ज्येष्ठ नागरिकांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!