– वाहतुकीचा खोळंबा, वाहनधारकांना अतोनात त्रास, ग्रामस्थांत संतापाची लाट!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक ते सावखेड या रस्त्यावरील खडका परिसरात एक पोकलेन मशीन घेऊन जाणारे अवजड वाहन चक्क रस्त्यात आडवे झालेले असून, वाहनधारकांना तेथून वाहन काढताना जीव मुठीत धरावा लागत आहे. या वाहनाने रस्ताच आडविल्याने परिसरातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत असून, पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून रस्ता मोकळा न केल्यास ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
मेरा बुद्रूकवरून काही अंतरावर असलेल्या खडका परिसरामध्ये मेरा बुद्रूक ते सावखेड नागरे रोडवर पोकलेन मशीन घेऊन जाणारे अवजड वाहन रस्त्यावर आडवे झालेले असून, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. हे वृत्तलिहिपर्यंत ते अवजड वाहन त्या ठिकाणावरून तसुभरही हलले नव्हते. त्यामुळे ऐन रात्रीच्या सुमारास मेरा बुद्रूक ते सावखेड नागरे हा रस्ता चक्क बंद झालेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्या ठिकाणावरून कोणतेही वाहन नेता येत नाही. गेल्या तीन तासांपासून मेरा बुद्रूक, सावखेड नागरे रस्ता बंद झालेला असतानाही पोलिस प्रशासन नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. आतापर्यंत हा रस्ता खुला झालेला नसल्याने परिसरातील ग्रामस्थ संतप्त झालेले असून, पोलिसांनी तातडीने हे वाहन हटवावे, अन्यथा ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता आहे.