– कवठा स्टेशन मास्तरच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
वर्धा (प्रकाश कथले) – घुघ्घुस येथून नाशिकला कोळसा घेऊन जात असलेल्या मालगाडीच्या एका डब्याला वर्धा ते पुलगाव दरम्यानच्या कवठा गावाजवळील रेल्वेमार्गावर आग लागली. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दल पथकाला बोलावून मालगाडीच्या कोळसा पेटलेल्या डब्याची आग विझविण्यात आली. पण यातून थरारच निर्माण झाला होता. मालगाडीच्या इंजिनपासून १७ व्या क्रमांकाच्या डब्यातील कोळशाला ही आग लागली होती.
हावड़ा -मुंबई रेल्वे मार्गावर वर्धा ते पुलगावच्या दरम्यान कवठा रेल्वेस्थानकात कर्तव्यावर असलेल्या स्टेशनमास्तरला मालगाडीच्या कोळसा असलेल्या १७ क्रमांकाच्या डब्यातून आगीचा धूर निघताना दिसला. कवठा येथील रेल्वेस्टेशन मास्तरांनी या आगीच्या घटनेची माहिती पुलगाव रेल्वे स्टेशन मास्तरला दूरध्वनीद्वारे दिली. पुलगावच्या स्टेशनमास्तरने मालगाडी चालकाला पुलगाव रेल्वेस्थानकात मालगाडी थांबविण्यास मालगाडीच्या चालकाला सूचना केली. तोपर्यंत पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाला बोलावून घेतले होते. त्यापूर्वी मालगाडीच्या लाईनवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मालगाडी थांबताच केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाने पोहोचून आग लागलेल्या कोळशाच्या डब्यावर पाण्याचा जोरदार मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. केंद्रीय दारुगोळा भांडाराच्या अग्निशमन दल पथकातील अधिकारी, कर्मचारी तसेच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता प्रयत्न केले. अद्याप मालगाडीला पुढे जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. आग विझल्याची पुरती खात्री करून घेतल्यानंतरच कोळसा घेऊन जाणार्या मालगाडीला पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.