BULDHANACrimeKhamgaonVidharbha

लेखणी धरणार्‍या हाती आले गावठी कट्टे!

– खामगाव शहराजवळील वाड़ी परिसरातील धक्कादायक घटना

खामगाव/ बुलढाणा (बाळू वानखेडे) – अभ्यास करणारे डोके आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. हाती लेखणी धरण्याच्या वयात विद्यार्थ्यांच्या हातात गावठी कट्टे आले आहेत. त्यामुळे समाजमन सुन्न होण्याची वेळ आली असून, खामगाव येथे वसतीगृहात राहणार्‍या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे चक्क गावठी कट्ट्यासह पाच जीवंत काडतुसे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज, २१ मेरोजी खामगाव शहराजवळील वाड़ी परिसरातील सन्मती मुलांचे वसतीगृह येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खामगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना खामगाव शहराजवळील वाड़ी परिसरातील सन्मती मुलांचे वसतीगृहातील एका मुलाकड़े देशी कट्टा व जीवंत काड़तुसे असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता, पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे, सहाय्यक फौजदार मोहन करूटले, पोकॉ. अमरदीप ठाकूर, पोकॉ. गणेश कोल्हे, पोकॉ. अंकुश गुरूदेव व पोकॉ. विष्णू चव्हाण यांनी सदर सन्मती वसतीगृहातील रूम नं. २०५ मधील नितीन राजू भगत (वय २२) रा. आंबेटाकळी ता.खामगावसह रूमची झाड़ाझड़ती घेतली असता, पलंगाखाली काळ्या रंगाची बॅग आढळली.

सदर बॅगची झड़ती घेतली असता यामध्ये कपड़े तसेच नितीन राजू भगत नावाचे इयत्ता दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र व जात पड़ताळणी प्रमाणपत्र देखील आढळून आले. तसेच पिस्टलच्या आकाराचा देशीकट्टा व पाच जीवंत काडतुसे विनापरवाना बाळगल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोपी नितीन राजू भगत रा. आंबेटाकळी ता.खामगाव याच्याजवळून वरील प्रकारचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरूध्द खामगाव शहर पोलिसांनी अप नं.२४४/२३ कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!