ChikhaliHead linesVidharbha

सैलानीनगर परिसरातील दंगल भोवली; चिखलीच्या ठाणेदाराची तडकाफडकी बदली!

– ठाणेदार भूषण गावंडे यांना मुख्यालयात हलविले!

चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – चिखली शहरातील सैलानीनगर परिसरातील दंगलप्रकरणी वादग्रस्त ठरलेले चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांची अखेर तडकाफडकी बदली झाली असून, देऊळगावराजाचे ठाणेदार जयवंत सातव यांच्याकडे तात्पुरता चिखली पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी ही कारवाई केली.

दिनांक १६ मार्चच्या रात्री चिखली शहरात सैलानीनगर परिसरामध्ये डिजेवर लावलेल्या गाण्यावर आक्षेप घेत एका गटाने धिंगाणा घातला होता. त्यामुळे शहरातील वातावरण चिघळून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात दंगाकाबू पथक तैनात करण्यात येऊन याप्रकरणी ५० ते ५५ जणांविरूद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख विलास घोलप यांच्यासह काही हिंदू तरुणांना पोलिसांनी विशेष करून सैलानी नगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका पोलिसाने जबर मारहाण केली होती. िंहदू मुलांना तर घरातून बाहेर काढून मारहाण झाली होती. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले होते.

ठाणेदार भूषण गावंडे यांना तातडीने निलंबीत करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांना निवेदनदेखील देण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी ठाणेदार भूषण गावंडे यांची तडकाफडकी बदली केली असून, चिखली पोलिस ठाण्याचा अतिरिक्त चार्ज देऊळगावराजाचे ठाणेदार जयवंत सातव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत गावंडे हे पोलिस मुख्यालयात थांबणार आहेत. या कारवाईबद्दल सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले असून, सैलानीनगर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, निर्दोष तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्यादेखील करण्यात आलेल्या आहेत.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!