ChikhaliHead linesVidharbha

मेरा बुद्रूकचे आरोग्य उपकेंद्र बनले दारुड्यांसाठी ‘ओपन बार’!

– अनेक दिवसांपासून पाच पदे रिक्तच, रुग्णांना घ्यावे लागतात खासगी दवाखान्यांत उपचार!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरूपी डॉक्टरच नसल्याने, गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर कुणाचाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मेरा बुद्रूक ग्रामपंचायत १३ हजार ते १५ हजार लोकसंख्येची असताना या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गरीब रुग्णासाठी डोकेदुखी ठरले आहे. अनेक गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ येत आहे. धक्कादायक बाब अशी, की या केंद्राच्या परिसरात दारूड्यांनी धुमाकूळ घातला असून, दिवसा व रात्री येथे खुशाल दारूपित बसत असल्याने हे केंद्र ‘ओपन बार’च बनले आहे.

दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच.

अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या मेरा बुद्रूक येथील उपकेंद्र हे अनेक विषयांमध्ये चर्चेत आहे. उपकेंद्रामध्ये अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पाच पदे आज पर्यंत भरण्यात न आल्यामुळे आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. या उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे चक्क प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे दारुड्यासाठी ओपन बार झाले, अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा ढीग साचलेला ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पाहणीत आढळून आला. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्याचा ढीग पडला असून, याकडे कुणीही लक्ष देत नाहीत. असे असतानासुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्ष का करत आहे ही एक शोकांतिका आहे.


सरकारने गोरगरिबासाठी गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय केलेली आहे. मेरा बुद्रूकमध्ये आरोग्य केंद्र आहे, पण डॉक्टरच नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावा लागत आहे. गरीब रुग्णांना उपचाराबरोबरच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने, लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टर व अन्य पदे भरून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. मेरा बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामधील रिक्त पदे लवकरात लवकर न भरल्यास ग्रामस्थ आरोग्यमंत्र्याकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!