Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

खा. मुकुल वासनिक जिल्ह्यात; लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी घेणार आढावा!

– शिवसेना, वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही बुलढाणा लोकसभा हवी!
– हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, रविकांत तुपकर किंवा राहुल बोंद्रे लोकसभेसाठी महाआघाडीचे संभाव्य उमेदवार!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार मुकुल वासनिक हे आज बुलढाण्यात दाखल झाले आहेत. दोन दिवस ते जिल्ह्यात असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेसच्या तयारीचा आढावा व इच्छुकांची चाचपणी खा. वासनिक हे करणार असून, काही खासगी कार्यक्रमांना हजेरी व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी ते घेणार आहेत. दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस दावेदार असून, महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील हा मतदारसंघ हवा आहे. या शिवाय, वंचित बहुजन आघाडीदेखील या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचे चांगलेच त्रांगडे बनलेले आहे.

खासदार मुकुल वासनिक आज २० मे व उद्या २१ मेरोजी दोन दिवस बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दरम्यान ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असून, काही खासगी कार्यक्रमांनादेखील हजेरी लावणार आहेत. दुपारी चार वाजेदरम्यान त्यांचे बुलढाण्यात आगमन होऊन खासगी हॉस्पिटलचे उद््घाटन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसाठी आपला वेळ राखीव ठेवला आहे. २१ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दुपारी दोन वाजता मेहकर येथील एका लग्न सोहळ्याला ते उपस्थित राहणार असून, सोयीनुसार नागपूरकड़े प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कळवले होते. दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस दावेदार असून, हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता व स्वतः मुकूल वासनिक हे येथून खासदार राहिलेले आहेत. आतादेखील २०२४च्या निवडणुकीत स्वतः वासनिक हे बुलढाण्यातून उभे राहू शकतात.

तथापि, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असून, जयश्रीताई शेळके यादेखील लोकसभेसाठी तयारी करत आहेत. तथापि, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालादेखील बुलढाण्याची जागा हवी असून, तेथून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहू शकतात. तसेच, वंचित बहुजन आघाडीनेदेखील बुलढाण्याच्या जागेसाठी आग्रह धरला असल्याची माहिती हाती येत आहे. वंचित आघाडीला बुलढाण्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करायचा असून, त्यासाठी जिल्ह्याची जातीय समिकरणे पाहून उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे खासदार मुकुल वासनिक यांच्या बैठकीत हा लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा आढावा घेताना हे मुद्देदेखील चर्चेत येणार आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांत काँग्रेसने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तसेच, राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा प्रभाव जिल्ह्यात कायम असून, मोदी सरकारविषयी असलेली चीड काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे गरज पडल्यास स्वतः मुकुल वासनिक हेदेखील बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार राहू शकतात. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरी ते बुलढाण्याशी आपली नाळ जुळवून असून, मरण आणि तोरणदारी ते हजर राहत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!