मेरा बुद्रूक परिसरात चंदनतस्कर ‘पुष्पां’चा उच्छाद; चंदनतस्करीसह अवैध वृक्षतोडीनेही जंगले साफ!
– मेरा बुद्रूक परिसरासह अनेक गावांत जिल्ह्याबाहेरील चंदनतस्कर सक्रीय!
– चंदनतस्करी, अवैध वृक्षतोडीतून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल; कुणा अधिकार्यांचे खिशे होतात गरम?
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे असून, या भागात सक्रीय असलेल्या चंदनतस्कर ‘पुष्पां’नी बेफामपणे चंदन झाडांची कत्तल लावली आहे. तसेच, अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी या चंदनतस्करी व वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दृष्टीने कानाडोळा करत असल्याचे संतापजनक चित्र आहे. सद्या सुरू असलेल्या चंदनतस्करीतून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल सुरू असून, या पैशातून कोणत्या अधिकार्यांचे खिशे गरम होत आहे? असा प्रश्न संतप्त शेतकरी व निसर्गप्रेमी उपस्थित करत आहेत. या सर्व गंभीर प्रकाराबाबत लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली जाणार आहे.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक गाव परिसरात अवैध चंदन तस्करीसह, वृक्षतोड जोमात चालू असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. मेरा बुद्रुक सह परिसरात अनेक ठिकाणी चंदनाची झाडे विपुल प्रमाणात आढळून येत होती, पण चंदन तस्करीमुळे त्यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. चंदनाची फळे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. पक्षांच्या विष्ठेद्वारे चंदनाचा प्रसार होतो. त्यातून ठिकठिकाणी चंदनाची झाडे उगवतात. हळूहळू ही झाडे मोठी होतात, मात्र अचानक एका रात्रीत ती गायब झालेली दिसतात. जंगलातील, शेताच्या बांधावरील एवढेच नव्हे तर एखाद्या घराच्या आवारातील झाडे ही अशाच प्रकारे रातोरात गायब झाल्याचे आढळून आले आहे. चंदनाच्या झाडाला बाजारात प्रचंड किंमत मिळते. मात्र चंदनाच्या बाबतीत समाजात प्रचंड अज्ञान व उदासीनता आढळून येते. यामुळे चंदनचोरीच्या बाबतीत सहसा तक्रारीही दाखल होत नाहीत. चंदनतस्कर हे मेरा बुद्रुक शिवारात पहाटेच्या अंधारातच झाडांची तोड करून त्यातील चंदन लंपास करत आहेत. मेरा बुद्रुक शिवारातील शेतातील चंदनाची डेरेदार वृक्ष अज्ञात चंदनतस्करांनी चोरून नेल्याचे अनेक प्रकरण समोर येत आहे. तरी या शिवारात अनेक दिवसांपासून चाललेल्या चंदनतस्करी बाबत वन विभागाकडून कुठलीही कारवाई करत नसल्याने चंदनतस्कर बेफाम झालेले दिसून येत आहेत.
मेरा बुद्रूक शिवारात चंदनतस्करीच्या वाढत्या घटनांमुळे व अवैध वृक्षतोडीने वृक्षप्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिवसाकाठी या भागात फिरून चंदनाची झाडे कोठे आहेत, याची रेकी तस्करांकडून केली जाते. रात्री किंवा पहाटेच्या दरम्यान ग्रूपने येऊन या भागातील चंदनाच्या झाडाच्या बाजूने आरीच्या साहाय्याने झाडाचा बुंधा कापून त्यातील चंदन लंपास करीत आहेत. तोडलेल्या झाडांच्या फांद्या त्याच ठिकाणी टाकून पसार होत आहेत. मात्र, एवढे मोठी झाडे तोडलेली दिसूनही वनविभाग गप्प कसा? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तरी मेरा बुद्रूक परिसरातील आजूबाजूच्या गावात चंदनतस्करीसह वृक्षतोड जोमात असताना वनविभाग व प्रशासन यांचा असलेला अर्थपूर्णरित्या कानडोळा, याच्यावर वृक्षप्रेमी, शेतकरी यांचा तीव्र संताप व्यक्त करत असून, याबाबत काही सुज्ञ नागरिक वनविभागाच्या संबंधित अधिकार्यांविरोधात वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार आहेत.