बुलडाणा (खास प्रतिनिधी) – शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या चिखली रोड वरील मोठया देवीला लागून असलेले फुलांचे दुकान फोडून रोख दिड लाख रुपये चोरी झाल्याची घटना 13 मे रोजी सकाळी 07.30 वाजता उघडकीस आली.
राजेंद्र नारायण बराठे, वय 41 वर्ष रा. धांडे ले आउट धाड नाका, सागवन परीसर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की, शहरातील मोठया देवी जवळ चिखली रोड वर त्यांची जगदबा फुल सेंटर या नावाने दुकान आहे. 12 मेच्या रात्री 11.30 वाजता ते आपले काम आटोपून दुकान बंद करुन घरी निघुन गेले. रात्रीची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडुन दुकानात ठेवलेले रोख 1,50,000/ – (दिड लाख रुपये) रुपये चोरून नेले. ही बाब 13 मेच्या सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द आज 14 मे रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोना प्रकाश दराडे हे करीत आहे. तर बुलडाणा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठी देवीचे मंदीर असून याच परिसरात चोरी झाली आहे. हाच परिसर सुरक्षित नसून शहराचे काय? असा प्रश्न सामान्य नागरीकांमध्ये उपस्थित होत आहे.