बुलडाणा (खास प्रतिनिधी) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या दिमाखदार शोभायात्रेवर येथील संगम चौकात हेलिकॉप्टरने करण्यात आलेली पुष्पवृष्टी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी रीघ लावली होती. हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून केलेली पुष्पवृष्टी हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते.
अवकाशातून फुलांचा वर्षाव होत असताना, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमले होते. शोभायात्रेमध्ये विविध ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप, तानाजी, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आदी वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवप्रेमी मध्ये मोठा उत्साह संचारला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीने व धर्मवीर आखाडाने शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.