सानंदांनी घेतली राजनाथसिंहांची भेट; अन बुलढाणा जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – केंद्रीय संरक्षणमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांची खामगावचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने औपचारिक भेट घेतली. परंतु, या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताच, आणि त्यात देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांच्यासह माजी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहदेखील दिसून येताच, हे ‘खामगावात भाजपचे ऑपरेशन लोटस’ तर नाही ना, अशी राजकीय चर्चा जिल्ह्यात रंगली होती. तथापि, या सर्व चर्चांना व शक्यतांना सानंदा यांनी पूर्णविराम दिला आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची आज १४ मेरोजी खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते राणा दिलीपकुमार सानंदा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस हेदेखील हजर असल्याने हे ‘ऑपरेशन लोटस’ तर नाही ना? अशी खमंग चर्चा रंगली होती. तथापि, ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी माहिती खुद्द सानंदा यांनीच दिली आहे. आज, १४ मेरोजी राजपूत समाज महासंमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर संमेलनाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची उपस्थिती लाभली होती. या संमेलनाला केंद्र व राज्यातील अनेक मंत्र्यांसह राजपूत समाजातील मान्यवरदेखील उपस्थित होते.
दरम्यान, येथे राजनाथसिंह यांची खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी भेट घेऊन सहृदय सत्कारदेखील केला. सदर सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याबद्दल ऑपरेशन लोटस झाले आहे, अशी खमंग राजकीय चर्चा रंगली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, सोबतच रावसाहेब दानवे आणि कृपाशंकर सिंह हेदेखील उपस्थित दिसत असल्याने अनेकांना सानंदा भाजपमध्ये गेले की जात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला होता. या चर्चेला टेकूही मिळाला, कारण देवेंद्र फड़णवीस यांनी या अगोदर राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वीरित्या पार पाड़ले आहे. विशेष म्हणजे माजी आ. सानंदा यांनी गेल्यावेळी विधानसभा निवड़णूकदेखील लढविली नाही. परंतु या दरम्यान माजी आ. सानंदा यांचे गळ्यातील तिरंगा दुपट्टा सर्व काही सांगून जातो. सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट होती, असे नंतर सानंदा यांच्यावतीने ठरावीक पत्रकारांकडे स्पष्ट करण्यात आले. तसे पाहाता, सानंदा हे पक्के काँग्रेसी आहेत, परंतु राजकारणात काहीही अशक्य नाही हे सत्यही नाकारून चालणार नाही. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड़, रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंह इंगळे यांच्या मान्यवर उपस्थित होते.
सोशल मीडियावर विविधांगी चर्चा सुरू असताना, भाजपच्या खामगावातील एका नेत्याने मात्र सानंदा यांना भाजपात येऊनही काही फायदा होणार नाही, असा खोचक टोला मारला. कारण, विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांचे भाजपात पक्के स्थान असून, सानंदा येथे येऊन काय करतील? त्यांनी तिकडे काँग्रेसमध्येच थांबावे, असा खोचक सल्लाही या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिला.
————–