बुलढाणा (संजय निकाळजे) – इतर देशातील बौद्ध धर्मीयांना बोलवून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धम्म परिषदा घेऊन बौद्ध असल्याचे भासवत आहे. मात्र ते स्वतःच तोतया बौद्ध आहेत. त्यांच्यासह इतरांना जर कुणाला बौद्ध धम्माचा गोडवा चाखायचा असेल तर आधी ब्राह्मणी विचारसरणी विसरावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बुलढाणा येथे गोल्डन पॅलेस लॉन्स येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन शनिवार १३ मे रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी भंते विजयकीर्ती महाथेरो, भंते रेवत, भंते राजरत्न, भन्ते धम्मदीप, भंते संघरत्न आदींची उपस्थिती. यावेळी झालेल्या धम्म परिषदेचे अध्यक्षस्थानी आर एन घेवंदे हे होते. तर यावेळी मंचावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, राज्य संस्कार प्रमुख रविकांत जाधव, विभागीय अध्यक्ष आर. पी. अवचार, विभागीय संघटक सुखदेव गावंडे, विभागीय कार्याध्यक्ष अनंतराव मिसाळ, वाशिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अकोला जिल्हाध्यक्ष अरुण चक्रनारायण, अमरावतीचे राजेंद्र छापाने, छायाताई जाधव, प्रेमानंद मगरे, संजय हेरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वप्रथम राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका, ग्राम शाखा, सर्कलसह, महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. तर उपरोक्त मान्यवरांचे स्वागत भारत साबळे, एस एल डवले, समाधान जाधव, प्रीतमकुमार मिसाळसर, प्रकाश साळवे, छायाताई जाधव, गणेश इंगळे, विठ्ठल सोनकांबळे, मुकुंद वानखेडे, नरेश अडेलकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले की, धम्मपरिषद आयोजित करत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बौद्ध आपण स्वतःला निर्माण करू शकलो का? बाबासाहेबांनी ज्या अपेक्षेने आम्हाला बौद्ध केलं ती अपेक्षा आपण पूर्ण केली आहे का? कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजही आपण जातीपातीतून बाहेर पडलो नाही. जाती सोडा आपण अजून पोट जातीतून बाहेर पडलो नाही, मग अशा अवस्थेत आज असू तर मग बाबासाहेबांनी आपणाला ज्या मार्गाने नेले आहे त्या मार्गावर आपण चालत आहोत का? आजपर्यंत आपण हिंदूंच्या असलेल्या जाती सोडलेल्या नाही. आणि त्यामुळे आपली प्रगती झालेली नाही. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालणार्या लोकांची आज प्रगती झाली. मात्र आपण जेथे आहोत तेथेच आहोत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षा झाल्यानंतर दुसर्या दिवशी सखोल मार्गदर्शन बाबासाहेबांचे झालं. मात्र पहिलं भाषण व्हायला हवं होतं व नंतर दीक्षा व्हायला हवी होती, मात्र त्यांची आधी दीक्षा झाली आणि दिक्षेचाच कार्यक्रम संपूर्ण दिवसभर चालल्यामुळे भाषण दुसर्या दिवशी झालं. मग बाबासाहेबांनी भाषणात समजून सांगितलं की, आता बौद्ध झाल्यानंतर आपणाला कशा पद्धतीने वागायचं. बाबासाहेब एक उदाहरण देतात ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नद्या एका महासागराला जाऊन भेटतात व नंतर ती नदी स्वतःच अस्तित्व संपून टाकते. कोणीही त्या महासागराचं पाणी की हे गंगेतून आलं, यमुनेतून आलं की गोदावरीतून आल आहे. असं वेगवेगळे करून दाखवू शकणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी एकमेकांना सामावून ते पाणी महासागराला जात, म्हणून बाबासाहेबांनी हे उदाहरण देऊन सांगितलं, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नद्या महासागराला जाऊन भेटतात. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या धर्मातून आलेली लोक याबद्दल महासागरामध्ये विलीन व्हा. म्हणजे तुम्हाला कोणीही वेगळं करून दाखवणार नाही. की हा महारातून आला, मातंगातून आला, चांभारातून आला अशी तुमची ओळख कायम राहता येणार नाही. अशा पद्धतीने बौद्ध धर्मामध्ये या ६०- ६५ वर्षे झाले आपण बौद्ध झालो. मात्र बुलढाणा जिल्ह्यात आपण आपल्या जातीची ओळख विसरू शकलो आहोत का? आजही आम्ही आमची जात तशीच कायम ठेवलेली आहे. या विभागात जात सोडा, पोट जाती ही खूप स्ट्रॉंग आहेत. पोटजातीचे राजकारण या जिल्ह्यात दिसून येतं. एक पोट जात दुसर्या पोट जातीसोबत व्यवहार करत नाही, किंवा रोटी -बेटीचा व्यवहार करत नाही. हे सर्व आपण सोडून एकसमान वागलं पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तेव्हा वाटलं होतं या धर्मामध्ये समानतेची वागणूक मिळेल, म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्माला पुनर्जीवित करण्याचे काम बाबासाहेबांनी केलं. आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचे उत्तर १५ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेब म्हणाले माझा लढा पैशासाठी, कॉलेज किंवा जमिनीसाठी नसून माझा लढा स्वाभिमानासाठी आहे. म्हणून मी तुम्हाला या धर्मात घेऊन आलेलो आहे. जनगणनेच्या बाबतीत राजरत्न आंबेडकर म्हणाले की, मला अनेक जण विचारतात की हे वर्ष जनगणनेच आहे, तर जनगणनेच्या रकान्यामध्ये काय लिहावं तर बौद्ध धर्मामध्ये इतर कोणतीही जात नसल्यामुळे आणि बौद्ध धर्मात इतर जाती असत्या तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हा धर्म स्वीकारला नसता, म्हणून त्या ठिकाणी बौद्ध लिहिलं पाहिजे. बौद्धांवर अन्य अत्याचार झाला की चर्चा होते की दलितावर झाला. वास्तविक दलित हा शब्द कुठेच प्रचलित किंवा लिहिलेला नाही. बाबासाहेबांनी संविधान हे जगाच्या संविधानाचा अभ्यास करून लिहिल असून सर्वांना एक समान न्याय दिला आहे. त्या संविधानाचा आदर आणि पालन आपण केलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तर इतर देशातील बौद्ध धर्मीयांना बोलवून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धम्म परिषदा घेत आहेत. व स्वतःला बौद्ध असल्याचा भासवत आहेत मात्र ते तोतया बौद्ध आहेत. त्यांच्यासह कुणालाही बौद्ध धर्माचा गोडवा चाखायचा असेल तर आधी ब्राह्मणी विचारसरणी विसरावी लागेल. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म हा पुनर्जीवित केलेला धर्म आहे. असेही शेवटी राजरत्न आंबेडकर म्हणाले. बौद्धांसाठी लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेची स्थापना करण्याचे विचाराधीन असून सर्वांनी त्याचे सभासद होण्याचे आवाहन राजरत्न आंबेडकर केले.
या धम्म परिषदेचे प्रास्ताविक एस एल डवले यांनी केले. यावेळी अविका जामणीक अकोला या बालिकेने सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन विभागीय अध्यक्ष समाधान जाधव यांनी केले. तर चिखली तालुका अध्यक्ष प्रीतमकुमार मिसाळसर यांनी आभार मानले. यासाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. शेवटी भोजनदानाने धम्म परिषदेची सांगता झाली.