दुसरबीड, ता. लोणार (प्रतिनिधी) – बुलढाणा अर्बनच्या दुसरबीड शाखेचे व्यवस्थापक अनिल धोंडोजी सांगळे (वय ५०) रा. जागदरी, ता. सिंदखेडराजा यांनी आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळले नसले तरी आजारपण किंवा कौटुंबीक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. श्री सांगळे अत्यंत लोकप्रिय व्यवस्थापक होते. तसेच, विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. सोशल मीडियावर ते आपली मते सडेतोडपणे मांडत असतं. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते.
बुलढाणा अर्बनच्या दुसरबीड शाखेचे व्यवस्थापक अनिल सांगळे हे रविवारी सुटी असल्याने जागदरी येथे आले होते. रविवारी सकाळी गावात फिरून आल्यानंतर ते शेतात गेले. बराच वेळ झाल्यानंतर ते परत न आल्याने त्यांचा मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी त्यांनी शेतातील फार्महाउसमध्ये गळफास घेतल्याचे मुलाला दिसले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. चार वर्षांपूर्वी सांगळे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांनी दुसरे लग्न केले असून, कौटुंबिक वादातून किंवा आजारपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. घटनास्थळी दुय्यम ठाणेदार गजानन मुंडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. सांगळे यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.
—————-