चिखली/बुलढाणा (जिल्हा/विशेष प्रतिनिधी) – सहावर्षीय निरागस बालिका राधिका विलास इंगळे हिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना चिखली तालुक्यातील रोहड़ा येथील तपोवन मंदिर परिसरात १३ मेरोजी उघड़कीस आली. समाजमन सुन्न करणार्या या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. या घटनेतील अज्ञात मारेकर्यांना त्वरित पकड़ून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उद्या, १५ मेरोजी चिखली शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशी येथील विलास इंगळे हे सहकुटूंब आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त चिखली तालुक्यातील रोहड़ा येथे आले होते. या लग्नसोहळयातून कु.राधिका विलास इंगळे वय सहा वर्ष ही अचानक बेपत्ता झाली होती. ती दिसत नसल्याने नातेवाईकांसह आई-व़डिलांनी शोधाशोध सुरू केला. अंढेरा पोलिसांसह सुमारे दोनशे ते अड़ीचशे ग्रामस्थही तिच्या शोधात लागले होते. अखेर काल, १३ मे रोजी लग्नस्थळापासून पाचशे मीटर अंतरावर सदर चिमुकलीचा दगड़ाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळखळ उड़ाली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने या घटनेच्या तपासावर बारीक लक्ष ठेवून आहेत तर आरोपीच्या शोधकामी स्थानिक गुन्हे शाखेसह अंढेरा पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. राधिकाच्या मृतदेहाचे बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात शवपरीक्षण करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.
दरम्यान, समाजमन सुन्न करणार्या व तेवढीच चिड़ निर्माण करणार्या या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या निर्दयी घटनेतील आरोपीला त्वरित अटक करावी व घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक संघटनांच्यावतीने चिखली बंदचे आयोजन उद्या, १५ मे रोजी करण्यात आले आहे. तरी अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कपिल खेड़ेकर यांनी आज ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले आहे.