CinemaHead linesWorld update

आर्यन खान ड्रग्जप्रकरणी २५ कोटींची लाच मागितली, ५० लाख घेतले; समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल, सीबीआयची छापेमारी!

– शाहरूख खानपुत्र आर्यनला अटक न करण्यासाठी मागितले होते २५ कोटी, घेतले ५० लाख!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कार्डेलिया क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य तिघांविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर लगेचच सीबीआयने वानखेडे यांच्या मालमत्तांसह देशभरात २९ ठिकाणी छापे मारले आहेत. सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हे छापे मारले. वानखेडे हे यापूर्वी एनसीबीचे (मुंबई झोन) संचालक होते. दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या अधिकार्‍याने आपल्या सहकार्‍यांसह कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यामध्ये आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. पण सध्या त्यांच्यावर झालेली बडतर्फीची कारवाई दुसर्‍या प्रकरणात झाली आहे.

समीर वानखेडे आणि इतर चौघांवर आर्यन खान कथित ड्रग प्रकरणात शाहरुखकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी २५ लाख रुपये उकळल्याचेही आरोपांत म्हटले आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्यासह एनसीबीचे आणखी दोन माजी अधिकारी आणि दोन खासगी व्यक्ती आरोपी आहेत. वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले असून, एनसीबीनेच समीर वानखेडेंविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची तक्रार केली होती. त्यासंदर्भात रिपोर्ट दिल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरमधल्या जवळपास २९ ठिकाणी यासंदर्भात सर्च ऑपरेशन सुरु होते. मुंबईत वानखेडे यांच्या गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंगमधील घरी सीबीआयची टीम पोहचली होती. या टीममध्ये तीन अधिकारी असून, मागील काही तासांपासून छापेमारी सुरू होती. एनसीबीच्या गुप्त अहवालाच्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत असून, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मेल यांनी एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये सना मलीक म्हणाल्या आहेत की, ”सत्य आणि सत्याशिवाय काहीही नाही.”
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!