आज मंत्रिपदे वाटपाची बोलणी; बच्चू कडू, संजय सिरसाठ यांना हवे ‘सामाजिक न्याय’!
– खातेवाटप हा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठा पेच
– भाजपकडे गृह, अर्थ, महसूल ही खाती राहण्याची शक्यता
– ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल किंवा कृषी खाते
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचे मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले असून, कुणा कुणाचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, याबाबतची बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे आज रात्री चर्चा करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. औरंगाबादचे आमदार संजय सिरसाठ व आमदार बच्चू कडू या दोघांनाही सामाजिक न्याय खाते पाहिजे असून, विद्यमान मंत्र्यांनाही त्यांचेच खाते पुन्हा हवे आहे. तर, गृह, महसूल व अर्थ मंत्रालय ही महत्वाची मंत्रालये भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल किंवा कृषी खाते दिले जाण्याची शक्यताही वरिष्ठस्तरीय सूत्र वर्तवित आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटपाची चर्चा यापूर्वीच झालेली आहे. आज रात्री दोघांत या चर्चेतून अंतिम नावे निश्चित होणार आहे. त्यानंतर फडणवीस हे दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून या यादीला मंजुरी देतील. तरीही ११ तारखेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच खाटेवाटप होऊ शकते, अशी माहितीही सूत्राने दिली आहे.
दर चार आमदारामागे एक मंत्रिपद असे सूत्र ठरले असून, त्यानुसार, शिंदे गटाला १४ ते १५ व भाजपच्या वाट्याला २६ ते २७ मंत्रिपदे येऊ शकतात. शिंदे गटात अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असून, त्यांना मंत्रिपदे मिळाली नाही तर ते नाराज होऊ शकतात. याशिवाय, बच्चू कडू, आशीष जैस्वाल, रवी राणा यासारख्या आमदारांनाही मंत्रिपद हवे आहे. तसेच, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मंत्री होते, त्यांनाही त्यांचेच खाते परत हवे आहेत. भाजपचे अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असून, पंकजा मुंडे-पालवे या आमदार नसल्या तरी, त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी भाजपातून होत आहे. त्यामुळे, शिंदे-फडणवीस हे मंत्रिमंडळाला कसे मूर्तरुप देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.