चिखली तहसील कार्यालयाने टाकली कात! पंचायत समिती, कृषी विभागाचा कारभार मात्र ‘रामभरोसे’!
– तहसील कार्यालयाचे रूपडे पालटले! ग्रामस्थांची कामेही वेगाने लागतात मार्गी!
चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी तहसील कार्यालयाची तीन महिन्यांपासून सूत्रे हाती घेताच कार्यालयाचे प्रवेशद्वार, समोरील ग्राउंड, आतमध्ये कुंड्यामध्ये झाडे लावून वातावरण निसर्गमय केले, तसेच नागरिकांना बसण्याची व्यवस्था आणि त्याठिकाणी वाचण्यासाठी विविध पुस्तके ठेवली. एवढ्यावरच न थांबता, शेतीची शेकडो न्यायप्रविष्ठ असलेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. असा आगळा वेगळा उपक्रम राबवित कार्यालयाची कात काढून टाकली. तर गेल्या पाच वर्षांपासून चिखली पंचायत समितीचा कारभार मात्र रामभरोसे सुरू असून, त्यात सुधारणा होण्याचे नाव नसताना ग्रामस्थ तहसीलदार आणि बीडीओ यांच्या कामकाजाची तुलना करायला लागले आहेत. एकीकडे तहसीलदारांच्या कर्तव्यतत्परतेबाबत कौतुक होत असताना, दुसरीकडे गटविकास अधिकारी यांच्याबद्दल संतापही तालुक्यात व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात दिडशे गावाचा सर्वात मोठा चिखली तालुका आहे, या तालुक्यात शेतकर्यांशी निगडित असलेले तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, कृषी कार्यालय ही चार महत्वाची कार्यालये आहेत. या कार्यालयात दररोज शंभर ते दीडशे खेड्या वरून नागरिक आपल्या कामासाठी येतात. मात्र प्रत्येक अधिकार्याच्या टेबल समोर दररोजच रांगा दिसत असल्याने दलालाचे चांगलेच मनोबल वाढले आहे. त्यामध्ये पंचायत समितीला गेल्या पाच वर्षांपासून कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नाही आणि दीड वर्षांपासून पदसिध्द पदाधिकारी नसल्याने प्रशासक लागून आहे. त्यामुळे तीन वर्षांत ९ ते १० गटविकास अधिकार्यांनी पदभार स्वीकारला अन महिन्याभरातच सोडून देत आहेत. यामध्ये मात्र प्रभारी पदभार घेण्यासाठी दरवर्षी अनेकजण वरिष्ठ अधिकार्यासोबत आर्थिक व्यवहार करून प्रभारी पदभार घेतात आणि खुर्चीत बसून कर्मचारी व नागरिकांची पिळवणूक करतात. त्याच बरोबर तालुका कृषी विभागाकडून वराती मागून घोडे अशा योजना राबविल्या जात असल्याने अनेक शेतकरी विविध शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकर्यांना शेतीसंदर्भात मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने उत्पन्नात मोठी घट होत आहे. तसेच तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारी पाहत आहेत आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेतीची मोजणीसाठी शेतकर्यांना तारीख पे तारीख करावी लागते, काही वेळा मोजणी होवूनही धुर्याची हद्द कायम केली जात नाही. शेताचे नकाशे, नकला आदी नकला मिळण्यासाठी आथिर्क भुर्दंड सहन करावा लागतो. असा गलथान कारभार चिखली तालुक्यातील इतरही अनेक महत्वाच्या कार्यालयात जोमात सुरू आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वरिष्ठ अधिकार्यांचे याकडे लक्ष असते. मात्र अधिकारीच झोपेचे सोंग घेवून याकडे मात्र दुर्लक्ष केल्या जाते. परंतु इकडे नुकतेच तीन महिन्यापासून तहसीलदार पदावर विराजमान झालेले सुरेश कव्हळे यांनी यावर मात करून आगळा वेगळा उपक्रम हाती घेवून तहसील कार्यालयाला लागलेला तारीख पे तारीखचा कलंक पुसून स्वच्छ केला. त्यामध्ये तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून तर संपूर्ण कार्यालयांत कुंड्यामध्ये वेगवेगळे झाडे लावून वातावरण निसर्गमय केले, नागरिकांना शांततेत बसण्यासाठी बैठक व्यवस्था, वाचण्यासाठी चांगल्या प्रकारची पुस्तके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संडास बाथरुम, एवढ्यावरच न थांबता प्रत्येक नायब तहसीलदार यांना आपआपल्या सर्कलमधील शेतकर्यांचे शेतीचे वाद, धुर्याचे वाद प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दिले, यामधूनही शेतकर्यांच्या प्रश्नाचे समाधान झाले नसल्यास तहसीलदार स्वत: प्रकरण हाताळत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले शेकडो प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाचे समाधान होत असल्याने ग्रामस्थांमध्ये अधिकारी असावा तर असा, अशी चर्चा ऐकायला मिळत आहेत.