Head linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

सत्तेसाठी हपापलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने उघडे पाडले!

– प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर विजय आमचाच – विधीज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज दिलेला निर्णय हा सत्तेसाठी हपापलेल्या लोकांना उघडे पाडणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मला समाधान वाटते. हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याच्या नव्हता, तर लोकशाही जीवंत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक होता. सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे राजकारण उघडे पाडले, असे जळजळीत प्रतिपादन शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय अध्यक्ष घेणार असले तरी, व्हीप माझ्याच पक्षाचा चालणार असल्याचेही ठाकरेंनी नीक्षून सांगितले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुंबई दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. भाजप विरोधात विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचे काम नितीश कुमार करत आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल दिल्याने आता उद्धव ठाकरे यांची पुढची रणनीती काय असेल, याकडेदेखील लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, की मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकलो असतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मी माझ्यासाठी लढत नाही, तर माझी लढाई जनतेसाठी आहे. माझा देश, माझ्या राज्यासाठी आहे. आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. देशामध्ये लोकशाहीची हत्या होत आहे. सत्तेसाठी हापललेल्या लोकांचे उघडे नागडे राजकारण सुरु आहे. राज्यापलांची भूमिका अयोग्य होती, याचे वस्त्रहरण झाले आहे. राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, या मुद्दादेखील सुप्रिम कोर्टात उपस्थित करण्याची गरज आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


घटनापीठाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित सर्वच मुळ मुद्यांवरील निर्णय आमच्या बाजूने आलेत. कोर्टाने राज्यपालांनी घेतलेले सर्वच निर्णय चुकीचे ठरवलेत. विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णयही चुकीचा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे,’ असे ते म्हणाले. ‘विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या व्हिपला मान्यता देऊन निर्णय घेतले. पण न्यायालयाने त्यांनी मान्यता दिलेले विधीमंडळ पक्षाचे व्हिप भारत गोगावले यांची नियुक्तीची अवैध ठरवली. तसेच राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हिपच खरा व्हिप असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर सत्याचा विजय झाला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाला नमन करतो,’ असे सिंघवी म्हणाले. ‘कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. अध्यक्ष एकच निर्णय घेऊ शकतात. तो म्हणजे व्हिपचे उल्लंघन करणार्‍या आमदारांना अपात्र ठरवणे. असे झाले तर मग उरले काय? यातूनच या प्रकरणी न्याय होईल व सत्याचा विजय होईल,’ असे सिंघवी म्हणाले. ‘सर्वच महत्त्वाच्या मुद्यावर सत्याचा विजय झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे कोर्टाने आम्ही त्यांना दिलासा देऊ शकत नाही,’ असे कोर्ट म्हणाले.


सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय – देवेंद्र फडणवीस

सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे त्यातील चार पाच जे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांपैकी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरले आहे. कारण उद्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरे त्यांनी स्पष्टपणे हे सांगितले आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
—————

https://breakingmaharashtra.in/suprime_court_live/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!