मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार इसरूळमधील संत शिरोमणी चोखोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील इसरूळ येथील संत शिरोमणी संत चोखोबाराय यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या १२ मेरोजी उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते लोकार्पण होणार आहे. संत सेवा ट्रस्टद्वारे हे राज्यातील पहिले चोखोबारायांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. याप्रसंगी मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे, असे आयोजकांच्यावतीने इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी नितीन दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा कळविला आहे. त्यानुसार, दि. १२ मेरोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री शिंदे हे मुंबई विमानतळावरून निघून सकाळी ११.५० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरणार आहेत. तेथून ते हेलिकॉप्टरने इसरूळ येथील हेलिपॅडवर उतरतील. दुपारी १२ वाजता त्यांचे इसरूळ येथील संत चोखोबाराय मंदिरस्थळी आगमन होणार असून, त्यांच्याहस्ते मंदिराचे लोकार्पण पार पडणार आहे. दुपारी दीड वाजता ते हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करतील. नंतर ते परत मुंबईला जाणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच येणारे मुख्यमंत्री इसरूळ येथील धार्मिक कार्यक्रमानंतर इतर कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाहीत, तसेच शासकीय बैठकदेखील घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाने कार्यक्रम स्थळाची पाहणी करून माहिती घेतली आहे, तसेच आयोजकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
—————
https://breakingmaharashtra.in/isrul_harinam_sapth/