सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सन २०२३ मधील बदल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या बदल्याची प्रक्रिया झाली. परंतु या विनंती आणि प्रशासकीय बदल्यामध्ये मुख्यालयामध्ये नेमके कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत, याबाबत प्रशासनाने कर्मचार्यांना सांगितलेच नाही. त्यामुळे झेडपी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त करीत झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची भेट घेतली.
विनंती आणि प्रशासकीय अशा दोन्ही पद्धतीच्या बदल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार व शासनाच्या जीआरप्रमाणे झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी माध्यमाशी दिली. दरम्यान, मंगळवारी दिवसभर विनंती आणि प्रशासकीय बदल्यासाठी ज्या कर्मचार्यांना बोलवण्यात आले आहे त्या कर्मचार्यांची गर्दी झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये व त्याच्या बाहेर दिसून येत होते. प्रशासनाने शासनाच्या जीआर प्रमाणे बदल्या कराव्या अशी मागणी कर्मचार्यांमधून होत होती. तसेच मुख्यालयातील रिक्त पदे ना दाखवण्याचा उद्देश नेमका काय आहे असा प्रश्न कर्मचार्यांना पडला होता. बुधवारी पशुसंवर्धन, कृषी विभाग, बांधकाम या विभागातील बदल्या करण्यात येणार आहे. दरम्यान कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज यांनी झेडपीचे अतिरिक्त सीईओ कोहिणकर यांना निवेदन दिले आहे. परंतु त्यांनी माध्यमाशी निवेदनाबाबत ब्र शब्द काढला नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीमागील उद्देश नेमका कळाला नाही.
अशा झाल्या विनंती व प्रशासकीय बदल्या!
शिक्षण विभाग (प्राथमिक) १, ग्रामपंचायत विभाग १६, सामान्य प्रशासन विभाग ३१, प्रशासकीय ७, आरोग्य विभाग ७२, महिला व बालकल्याण विभाग १, प्रशासकीय ४, वित्त विभाग ३, प्रशासकीय ३, आपली १ असे एकूण प्रशासकीय १४ विनंती ७२ बदल्या करण्यात आले आहेत.