Breaking newsHead linesWorld update

इस्लामाबाद हायकोर्टातून माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

– पाकिस्तानी रेंजर्सने केली अटक; इम्रान खानला मारहाण होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल!

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख तसेच माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना पाकिस्तानच्या रेंजर्सनी इस्लामाबाद हायकोर्टातून काचा फोडून अटक केली आहे. त्यांना गचांडी धरून वाहनात कोंबत नेण्यात आले. नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना मारहाणही केल्याचे दिसून येत आहे. या कारवाईनंतर पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, त्यांनी लाहोर येथील लष्करी अधिकार्‍याच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. इम्रान खान व पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचले असल्याचे स्पष्ट होत आहे.

अल-कादिर ट्रस्टमधील तब्बल ५० अब्ज रूपयांचा घोटाळा तसेच अन्य एका केसप्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे पाकिस्तानी पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, ही कारवाई पाकिस्तानी लष्कराच्या इशार्‍यावरून झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन खटल्यांत जामीन मिळविण्यासाठी इम्रान खान हे इस्लामाबाद हायकोर्टात गेले होते. तेथे ते एका बंद खोलीत असताना पाकिस्तानी रेंजर्सनी काचा फोडून आत प्रवेश केला व इम्रान खान यांना ताब्यात घेतले, गचांडी पकडून त्यांना वाहनात कोंबले व घेऊन गेले. या कारवाईबद्दल हायकोर्टानेदेखील आश्चर्य व्यक्त करत, कोणत्या गुन्ह्यात खान यांना अटक केली, अशी विचारणा सरकारला केली आहे. याबाबत इस्लामाबादचे पोलिस महानिरीक्षक अकबर खान यांनी सांगितले, की अल-कादिर ट्रस्टमधील घोटाळ्याप्रकरणी इम्रान खान यांना अटक झाली आहे. हा घोटाळा जवळपास ५० अब्ज रूपयांचा असून, त्यांत खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांचाही समावेश आहे.

इम्रान खान यांनी अटकेपूर्वी चार तास अगोदरच एक व्हिडिओ प्रसारित करत, पाकिस्तानी लष्कराला ललकारले होते. फौजेने हे लक्षात ठेवावे, की मी त्यांना घाबरत नाही. तसेच, मी पाकिस्तान सोडून पळून जाणारा नाही. इम्रान यांचे कान खोल के सुन ले, हे वाक्य पाकिस्तानी लष्कराला चांगलेच खटकले व त्यांनी रेंजर्स पाठवून इम्रान खान यांना गचांडी धरून अटक केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच खान यांना मारहाण झाल्याचेही पुढे येत आहे. या कारवाईनंतर लाहोर व इस्लामाबादमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले असून, हिंसाचार करत आहेत. लष्कर व कार्यकर्ते आमने-सामने येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

https://twitter.com/i/status/1655887915497431043

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!