BULDHANAHead linesVidharbhaWorld update

काय सांगता? कोथळीत जेवणावळीची चर्चा!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – लग्नसोहळा म्हटला की तो कसा यादगार करता येईल, यासाठी वधू-वरांचे वडील जीवाचे रान करतात. जमापुंजीतून जे काही करता येईल, याकडे त्यांचा कल असतो. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील सरोदे कुटुंबीयांनी आज मुलीच्या लग्न सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप दिले. ४ एकरात किल्लेदार मंडप टाकून मुलीचा विवाह मोठ्या धडाक्यात पार पडला. विशेष म्हणजे, हजार लोकांना गाव पंगत देत, गावातील गुरांसाठी कुटार, ढेप व कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा बेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोथळी येथील प्रकाश सरोदे यांच्या पूजा नामक मुलीचा विवाह अतुल रमेश दिवाने यांच्याशी रविवारी ७ मे रोजी मोठ्या उत्साहात कोथळी येथे संपन्न झाला. शेतकरी असलो तरी,मुलीचा शाही विवाह करू असे सरोदे यांचे स्वप्न होते. मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी राहणार नाही, असा संकल्प देखील मुलीच्या वडिलांनी घेतला होता. त्यामुळे प्रकाश सरोदे यांनी मुलीच्या विवाहासाठी ४ एकर जागेत किल्लेदार मंडपाची उभारणी केली. पंचक्रोशीतील चार ते पाच गावातील सर्वधर्मीय लोकांना चुलबंद आवतण देण्यात आले होते. शिवाय, लग्नात आहेर पद्धत बंद होती. विशेष म्हणजे, गावातील गुराढोरांना ३ ट्रॉली कुटार,१० क्विंटल ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या, मुंग्यांना साखर असा जेवणाचा बेत आखला होता.लग्न सोहळ्यात गाव जेवण हे ठरलेलेच असते. परंतु जनावरांनादेखील पंगत दिल्याने, या विवाह सोहळ्याला मूक प्राणीप्रेमाची किनार लाभली, त्यामुळे हा विवाह सोहळा चर्चेचा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!