BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

एका जनाजासोबत निघाल्या दोन अंत्ययात्रा; देऊळगाव साकरशा गहिवरले!

– जातीय-धार्मिकतेचे दोरखंड तटातटा तुटले, गावात चूल पेटली नाही, दुकाने बंद, लग्नाचा बॅण्डही वाजला नाही!

बुलढाणा/ मेहकर (बाळू वानखेडे) – तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जीवलग मित्र जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना काल, ६ मेरोजी रात्री आठ वाजेदरम्यान मेहकर – खामगाव रोड़वरील देऊळगाव साकरशा गावाजवळ घड़ली होती. सदर अपघातातील तीनही मृतकांवर आज, दि. ७ मेरोजी दुपारी देऊळगाव साकरशा येथे साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थितांचे ड़ोळे पाणावले होते. सर्वच जातीधर्माचे लोक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जातीयतेचे दोरखंड़ तटातटा तुटल्याची प्रचितीही यावेळी आली. हृदय हेलावणार्‍या या घटनेने गावावर शोककळा पसरली असल्याने गावात चूलही पेटली नाही. तर दुकाने बंद ठेवली गेली व गावात लग्नाचा बॅण्डदेखील वाजला नाही. गावात पहिल्यांदाच दोन अंत्ययात्रा व एक जनाजा सोबत निघाल्याचा दुर्देवी प्रसंग गावाने अनुभवला होता.

दुचाकी, इर्टिगा व पीकअप व्हॅन या तीन वाहनांचा मेहकर ते खामगाव रोड़वरील देऊळगाव साकरशा गावाजवळ ६ मेच्या रात्री आठ वाजेदरम्यान विचित्र अपघात झाला होता. या अपघातात मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील दुचाकीस्वार तथा शिवसेना (शिंदे गट) युवासेना शहरप्रमुख शेख इरफान शेख हुसेन, सचिन उर्फ गोलू सुभाष नहार व लक्ष्मण सीताराम गवळी या तिन्ही जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला होता. सदर मृतकांवर आज देऊळगाव साकरशा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मृतक तिघांच्याही अंत्ययात्रेत सर्वच जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जातीयतेचे दोरखंड़ तुटल्याचे दिसून आले. तीनही होतकरू तरूणाच्या जाण्याने देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली होती, गावात चूल पेटली नव्हती. आज सात एप्रिल लग्नतिथी दाट होती. विशेष म्हणजे, देऊळगाव साकरशा गावातही तीन लग्न होते. पण दुःखाचा प्रसंग पाहता लग्नात बॅण्डही वाजला नसून, अतिशय साध्या पध्दतीने विवाह सोहळे उरकण्यात आले. दरम्यान, यावेळी शिवसेना युवानेते योगेश जाधव, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, गजानन अल्हाट, प्रेम पाचपवार यांनी उपस्थितांच्यावतीने शोकसंवेदना व्यक्त केल्या. दोन अंत्ययात्रा व एक जनाजा सोबत निघाल्याचा देऊळगाव साकरशा गावातील हा पहिलाच दुर्देवी प्रसंग असावा. दरम्यान, मृतक सचिन उर्फ गोलू नहार व लक्ष्मण गवळी यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम ८ मेरोजी सकाळी होणार आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!