Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

तीन वाहनांच्या विचित्र अपघाताने देऊळगाव साकरशा हादरले, तीन जीवलग मित्र ठार; एकजण सीरिअस!

– मेहकर-खामगाव रोडवरील देऊळगाव साकरशा येथील भीषण दुर्घटना
– भरधाव इर्टिगाने उडविले, टेम्पाेनेही चिरडले, कारमधील एकजण अत्यवस्थ

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये भरधाव इर्टिगाने दुचाकीला उडविले, दरम्यान समोरून येणार्‍या पीकअपखालीही चेंदल्याने दुचाकीस्वार तिघे मित्र जागीच ठार झाले, तर इर्टिगा कारमधील एक जण सीरिअस असून, अकोला येथे आयसीयूत उपचार सुरू आहेत. तसेच तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मेहकर ते खामगाव रोड़वरील देऊळगाव साकरशा गावाजवळ ६ एप्रिलच्या रात्री आठ वाजेदरम्यान घड़ली. मृत झालेले तीनही युवक हे जीवलग मित्र होते, त्यांच्या अपघाती मृत्युमुळे देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली असून, नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच हंबरड़ा फोड़ला होता. दरम्यान, मृतकांवर दुपारी शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव साकरशा गावात पहिल्यांदाच एक जनाजा व दोन अंत्ययात्रा सोबत निघाले. दिवसभर गावात चुल पेटली नव्हती, तसेच लग्नात वाद्य वाजविले गेले नाही.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील शिवसेना (शिंदे गट) युवा सेना शहरप्रमुख शेख इरफान हुसेन वय ३७, सचिन उर्फ गोलू सुभाष नहार वय ३३ व लक्ष्मण सीताराम गवळी वय २८ हे तिघेजण दुचाकीने मेहकरकड़ून देउळगाव साकरशा गावाकड़े येत असताना, मागून भरधाव येणार्‍या इर्टिगाने त्यांच्या दुचाकीला जबर धड़क दिली, तर त्याचदरम्यान समोरून येणार्‍या पीकअपखालीही ते चिरडले गेले. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण ठार, तर कारमधील चाैघे गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजाज पठाण नामक व्यक्ती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या तीनही युवकांना धावाधाव करत खामगाव येथे दवाखान्यात नेले असता, ड़ॉक्टरांनी सदर तिघांना मृत घोषित केले. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच हंबरड़ा फोड़ला होता. या घटनेमुळे देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली आहे. जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कार्यवाही सुरू होती. मृतकांच्या शवपरीक्षणानंतर त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी देऊळगाव साकरशा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यातील सचिन उर्फ गोलू नहार अविवाहित होता. दरम्यान, मृतक तिघेही घनिष्ठ मित्र होते. तिघेही मनमिळाऊ व सुखदुःखात धावून जाणारे असल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.


अन् त्यांच्या जीवनाचा सिनेमा झाला!
दरम्यान, यातील मृतक सचिन उर्फ गोलू नहार याने आपण अकोला येथे कपड़े घेण्यासाठी जाऊ व सिनेमाही पाहू, अशी इच्छा काल मृतकांसह इतर मित्रपरिवाराजवळ व्यक्त केली होती. पण काळाने घाला घालत त्यांच्याच जीवनाच्या सिनेमाचा दी एण्ड केला. चित्रपटातील अपघाताच्या दृश्यापेक्षाही भयानक व काळिज पिटाळून लावणारे हे दृश्य होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!