Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

राजकीय निवृत्तीवर फेरविचाराचे शरद पवारांचे संकेत!

– राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, आंदोलन मागे घेण्याचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आदेश
– राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना ५ मेपर्यंत डेडलाईन, निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामासत्र सुरू केले आहे. तसेच, काही कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलनास बसले आहे. त्यामुळे मुंबईत पक्ष पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘सिल्वर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी जात, त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पवारांचा निरोप घेऊन अजित पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले, व ‘आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी साहेबांनी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे, असा निरोप दिला. तसेच, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी साहेबांना पुरेशा वेळ द्यावा, व आता आपआपल्या घरी जावे’, असे आवाहन केले. दरम्यान, शरद पवार यांनी ५ मेपर्यंत राजीनामा मागे घ्यावा. राजीनामा मागे न घेतल्यास ६ मेपासून राज्यभर आंदोलन करुन राजीनामा देणार, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेतली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ युवक राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच भूमिका घेत पवार यांना भावनिक आवाहन केले आहे.

राज्यभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजीनामासत्र सुरू केल्यानंतर शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार असल्याचे संकेत दिलेत. पवारांनी आज मुंबईतील पुस्तक प्रकाश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला. नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचे साकडे घातले. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांनी ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस द्या, असे आवाहन केले. कार्यकर्ते शांत झाले, तरच हा फेरविचार करू, असा निरोपही त्यांनी अजित पवारांमार्फत कार्यकर्त्यांना पोहोचवला.

अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी सांगितले की, माझा निर्णय मी घेतला आहे. पण तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन-तीन दिवस द्या, असे म्हणत अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना आंदोलन बंद करण्याचं आवाहन केले. ‘आज सकाळी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा ते असे काही बोलतील याची कल्पना तुम्हाला नव्हती. त्यानंतर तुम्ही आग्रह केला, त्यामुळे पक्षाचे काही नेते ‘सिल्व्हर ओक’वर गेले. मी, सुप्रिया, रोहित, भुजबळसाहेब यांच्याशी ते पुन्हा बोलले. आणि त्यांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे, असे अजित पवार याप्रसंगी म्हणाले. ‘कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यांचा एकाचाही राजीनामा स्वीकार केला जाणार नाही. अजिबात नवीन प्रश्न निर्माण करू नका. उपोषणाला बसणे वगैरे करू नका. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरता कामा नये, या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत’, अशीही माहिती अजित पवारांनी दिली. त्यानंतर कार्यकर्ते आपआपल्या गावी पांगायला सुरूवात झाली होती.


दुसरीकडे, या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये या साठी पोलिसांनी त्वरित शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परिस्थिती हाताळण्यासाठी या झोनचे पोलीस उपायुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः उपस्थित होते. ‘सिल्वर ओक’ यासोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त वाढवलेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!