– पोलिसांकडून तपास सुरु, खुनाचे कारण गुलदस्त्यात
नाशिक (ब्रेकिंग महाराष्ट्र) – मूळचे अफगाणिस्तानचे असलेले परंतु, नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहणारे मुस्लीम धर्मगुरु ख्वाजा सय्यद चिस्ती उर्फ सुफी बाबा वय ३५ यांची येवल्यातील एमआयडीसी परिसरात अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
येवला एमआयडीसी परिसरात अज्ञात चार व्यक्तींनी सुफी बाबा यांना अगदी जवळून गोळ्या घातल्या व नंतर मारेकरी फरार झालेत. हल्लेखोरांनी अगदी डोक्यात गोळ्या घातल्याने सुफी बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती येवला पोलिसांना कळताच पोलिस तातडीने घटनास्थळी धावले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, मारेकर्यांचा कसून शोध घेतला जात आहे. हे हत्याकांड का झाले, याबाबतदेखील माहिती घेतली जात असून, विविध शक्यतांच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
भूखंडाच्या वादातून हत्येचा संशय
मौलवी हे मूळचे अफगाणचे असले तरी सुफी बाबा म्हणून ते परिचित हाेते. गेल्या अनेक वर्षांपासून येवला शहरात राहात होते. तसेच, धार्मिक शिकवण देत होते. या हत्याकांडामागे काही धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद चिश्ती यांच्या चालकावर संशय असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. गोळ्या घालून मारेकरी एका वाहनातून फरार झाले असल्याचेही दिसून येते. पोलिसांच्या संशयानुसार, सय्यद चिश्ती यांची हत्या भूखंडाच्या वादातून झाली असल्याची शक्यता आहे. परंतु, अफगाणी नागरिक असल्याने चिश्ती हे भारतात भूखंड किंवा मालमत्ता खरेदी करू शकत नाहीत. परंतु, हे हत्याकांड एका खुल्या भूखंडाजवळ घडल्याने या बाबीला पुष्टी मिळत आहे.