गॅस सिलिंडर भडकले; तब्बल ५० रुपयाने महागले!
महागाईने गोगरिबांचे कंबरडे मोडले
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – केंद्र सरकारने गॅस दरवाढीचा भडका उडवला असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ५० रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर आता १०६६ रुपये दराने मिळणार आहे. १४ किलोच्या सिलिंडरच्या दरात ५० तर ५ किलो सिलिंडरच्या दरात १८ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या महागाईने गोगरिबांचे कंबरडे मोडले असून, आधीच पेट्रोल, डिझेल महाग असताना आता गॅसही महागला आहे.
मागील ४८ दिवसांपूर्वीच गॅसचे दर वाढले होते. आता पुन्ही लगेचच दुसरी दरवाढ झाली आहे. सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढून ते शहरी भागात १०५३ ते १०६६ झाले आहेत. यापूर्वी १९ मे रोजी गॅसच्या दरात साडेतीन रुपये तर वाणिज्य सिलिंडरच्या दरात ८ रुपयाने दरवाढ झाली होती. इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेत असल्या तरी, त्यांच्यावर केंद्र सरकारचे अंकुश असते.
ऑगस्ट २०२१ मध्ये गॅस सिलिंडरची किंमत ८७५.५० रुपये इतकी होती, ती आता १०६६ इतकी झाली आहे. तर मे २०२२ रोजी ती १०१८.५० रुपये इतकी होती. त्यामुळे वर्षभरात गॅसदराने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. वर्षभरात गॅस सिलिंडर २१८.५० रुपयांनी महागले तर आहेच, परंतु सरकारने त्याची सबसिडीही बंद केली आहे. उत्तर भारतात तर गॅसचे दर ११०० रुपयांच्यापुढे गेलेले आहेत.
—————–