आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे मेहकरमध्ये जोरदार स्वागत
मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे मेहकरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात आ. रायमुलकर यांचाही सहभाग आहे. तब्बल दोन आठवड्यांच्या राजकीय उलथापालथ व घडामोडीनंतर सर्वच बंडखोर आमदार स्वगृही परतले आहेत. रायमुलकर हेदेखील मतदारसंघात परतल्यानंतर त्यांचे मेहकर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी, खासदार जाधव साहेब हेच आपले राजकीय जन्मदाते आहेत, अशी प्रांजळ कबुली देत, जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, यात राजकीय स्वार्थ नाही, असे प्रतिपादन केले.
शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी डॉ. रायमुलकर यांच्या भूमिकेचे अद्याप राजकीय समर्थन केले नसले तरी, आजच्या या कार्यक्रमात माधवराव जाधव यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. मेहकर – लोणार विधानसभा मतदारसंघात काही कट्टर शिवसैनिकांना डॉ. रायमुलकर यांचे बंड आवडले नसले तरी, मतदारसंघातून मात्र फारसा विरोध झालेला नाही. अनेकांनी रायमुलकर यांच्या राजकीय भूमिकेचे स्वागतही केले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी मात्र अद्याप आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. लवकरच खासदार जाधव व रायमुलकर हे एकत्र बसतील, अशी माहितीही याप्रसंगी देण्यात आली. या कार्यक्रमाचे बहारदार व खुशखुशीत सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले.
—
डॉ. रायमुलकर यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा
महाविकास आघाडी सरकारमध्ये हुकलेली मंत्रिपदाची संधी एकनाथ शिंदे सरकारमध्ये आ. संजय रायमुलकर यांना मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. डॉ. रायमुलकर यांनी आमदारकीची हॅटट्रीक केलेली असून, जिल्ह्यातील सर्व भाजप व शिंदे समर्थक आमदारांना ते सीनिअर आहेत. त्यामुळे त्यांनाच मंत्रिपदी संधी मिळावी, अशी मतदारसंघातून अपेक्षा व्यक्त होत आहे.
—————-