– नागपुरात फडणवीस यांची जल्लोष यात्रा
नागपूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – ‘आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल’, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा राज्य भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील राजकीय घडामोडी आणि सरकार स्थापनेनंतर फडणवीस यांचे सहकुटुंब पहिल्यांदाच नागपुरात आगमन झाले. यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे भव्यदिव्य असे ‘जल्लोष यात्रा’ काढत स्वागत करण्यात आले.
विदर्भाच्या विकासाकरिता विशेष लक्ष देणार असून, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दाही लवकरच सोडविला जाईल. केंद्रीय नेतृत्वाशी व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, मंत्रिमंडळाची यादी निश्चित होईल, असे फडणवीस म्हणाले.
तर ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. शिंदे यांचेही ठाण्यात जोरदार स्वागत झाले.