BULDHANAVidharbha

तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ‘दलितबंधु योजना’ लागू करा!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दलितबंधू योजना लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात, जैन यांनी राज्य सरकारने ही योजना लागू केली तर राज्यातील दलित समाज बांधवांचे जीवनमान उंचावेल, असेही नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंध्रप्रदेशमधून काही वर्षापूर्वी वेगळा झालेला तेलंगणा ह्या राज्याने सर्व नागरिकांसाठी वेगवेगळया प्रकारच्या योजना सुरु केलेल्या आहे. व्यापारी, शेतकरी, दलित बंधू असो यांच्याकरिता त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना कायमचा रोजगार मिळावा आणि घरात असलेले अठराविशे दारिद्रय कायमचे दूर व्हावे, यासाठी तेलंगणा राज्यातील दलित लोकांसाठी दलित बंधु योजना सुरु केली. त्यामुळे हजारो दलित युवकांना, युवतींना रोजगार मिळाला. तसेच उत्पन्नाची साधने मिळाली आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे राहून समाजामध्ये सन्मानपूर्वक जीवन जगत आहे. अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात लागू केल्यास महाराष्ट्रातील दलित बंधुंना रोजगारही मिळेल, ते आपल्या पायावर उभे राहू शकतील, तेलंगणा हे राज्य भौगोलिकदृष्टया महाराष्ट्रापेक्षा लहान असून लोकसंख्याही महाराष्ट्रापेक्षा खूपच कमी आहे.

तेलंगणा राज्यनिर्मितीस काही वर्षेच होऊनसुध्दा त्या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी दूरदर्शीपणाने लोकांना येणार्‍या अडचणी आणि त्यावर उपाययोजना याची योग्य सांगड घालून निर्णय घेतले. त्यामुळेच तिथल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाणही कमी झालेले आहे. तेलंगणा या राज्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा महाराष्ट्राचे एकूण उत्पन्न हे कैकपटीने जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या लोकहिताच्या योजना महाराष्ट्र सरकारला सहज शक्य आहे, असे जितेंद्र जैन यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!