BULDHANAHead linesVidharbha

पीक नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्या!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – नैसर्गिक आपत्ती शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, घरांची, गोठ्यांची पडझड झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करुन शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मका, कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे उडाली, घरांची पडझड झाली तर अनेकाच्या शेतातील गोठ्यांचीही पडझड झाली आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी कोलमडून पडला आहे. याआधी खरीप हंगामात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगामातही अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना शासनाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु खरीप आणि रब्बीतही शेतकर्‍यांचा भ्रमनिराश झाला.

खरीप हंगामातील मंजूर असलेली नुकसान भरपाई अजूनही हजारो शेतकर्‍यांना मिळालेली नाही. त्यातच सातत्याने होत असलेल्या निसर्गाच्या कहरामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे, ही सर्व बिकट परिस्थिती पाहता, सरकारने शेतकर्‍यांप्रती संवेदनशील होऊन झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!