वर्धा (प्रकाश कथले) – कौटुंबिक मतभेद विकोपाला गेल्यानंतर सातत्याने घरात होणार्या भांडणात पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर पतीनेही विष घेत आत्महत्या करण्याची घटना आंजी मोठी गावातील वॉर्ड क्रमांक चारमध्ये घडली.या घटनेत पत्नी शीतल कुंदन कांबळे (वय ४०) हिचा पती कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (वय ४८) याने विटा तसेच दगडाने ठेचून खून केला. यावेळी त्याने घराचे दार आतून बंद करून घेतले होते. त्यानंतर त्यानेही विष घेत जीवन संपविले.
शीतल तसेच कुंदनला दोन अपत्य आहेत. यात मुलगी मैत्री (वय१३) आणि मुलगा सम्राट (वय ९) हे शाळेला सुटी असल्याने ते मामाच्या गावाला गेले होते. त्यामुळे पती, पत्नीच घरी होते. शीतल कांबळे आणि कुंदन कांबळे हे आंजी मोठी येथे किरायाचे घर घेऊन राहात होते. त्यांचे मूळ गाव धुळवा असून हे गाव आंजीजवऴच आहे. कुंदन कांबळे तसेच शीतल कांबळे शेती करायचे. कोठल्या तरी कारणाने त्यांच्यात मतभेदाची ठिणगी पडली. मतभेदाची जागा मनभेदाने घेतली, त्यातून हे विपरीत घडले. काल दिवसभर त्यांच्या घराचे दार उघडले नव्हते. त्यातून शेजार्यांना संशय आला. त्यांनी कुंदन कांबळे यांच्या भावाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याने आंजी पोलिस चौकीत तसेच खरांगणा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी काल रात्री आठ वाजता आंजी येथे येत घराचे दार उघडले. तेव्हा घरातील बेडरूममध्ये पलंगावर शीतल कांबळे हिचा मृतदेह पडलेला दिसला. जवळच वीट पडून होती. पलंगावर रक्त पसरले होते. तर घरातच कुंदन कांबळे याचा मृतदेह पडून दिसला. त्याच्या मृतदेहाजवळच विषाची बाटली पडली होती. त्यावरून त्याने पत्नीचा खून केल्यानंतर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी खंरागणा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर तत्काळ सहकार्यांसह पोहोचले होते. त्यांनी घटनास्थऴाचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, पुलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुलसिंग पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात आंजीचे सहायक उपनिरीक्षक विनोद सानप, जमादार दीपक जाधव, गिरीश चंदनखेडे, अमर हजारे पुढील तपास करीत आहेत.
कुठल्याही कारणातून कुटुंबात कितीही टोकाचे कौटुंबिक मतभेद झाले तरी ते मिटविता येतात, हे भानच न राहिल्याने हे मृत्यूकांड घडले. यात कांबळे कुटुंबातील दोन्ही निरागस मुले मातृपितृ छत्र हरवून बसली. एका कुटुंबाचा अविचारीपणानेच कडेलोट झाला. अविचाराची जागा विचाराने घेतली असती आणि क्षणिक रागाला आवर घालत मतभेद आपसात चर्चेने मिटविले असते तर स्नेहबंधनाला तडाच गेला नसता, असे नागरिक बोलत आहेत.