जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचा निकाल एकाच दिवशी घोषित करा!
– काँग्रेसनेते ज्ञानेश्वर पाटील यांची सहकार निवडणूक प्राधीकरणाकडे हरकत दाखल
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी २८ व ३० एप्रिलला मतदान होत असून, निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ तारखेच्या निकालाचा ३० एप्रिलच्या मतदानावर प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने निवड़णूक होत असलेल्या सर्वच बाजार समित्यांचा निकाल एकाच दिवशी घोषित करावा, अशी मागणी खामगाव विधानसभा काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील यांनी सहकार निवडणूक प्राधीकरणाकडे केली आहे.
याबाबत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पुरूषोत्तम पाटील यांचा संदर्भ देत, सचिव राज्य सहकारी निवड़णूक प्राधिकरण, पुणे यांना पाठविलेल्या हरकत पत्रात नमूद आहे, की मेहकर, देऊळगावराजा, खामगाव, बुलढाणा व मलकापूर बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होत असून, त्याच दिवशी निकालही जाहीर करण्यात येणार आहे. चिखली, लोणार, शेगाव, जळगाव जामोद व नांदुरा बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार असून, निकालही त्याच दिवशी घोषित होणार आहे. यामध्ये २८ एप्रिलरोजीच्या घोषित निवड़णूक निकालाचा ३० एप्रिलरोजी होणार्या मतदानावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ३० एप्रिलरोजी एकाच दिवशी करावी, असेही हरकत पत्रात नमूद केलेले आहे.
—————-