‘ओबीसी’तून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होणार!
– इंदापूर येथे मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय; तुळजापूर ते मंत्रालय निघणार मोर्चा
इंदापूर (तालुका प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निकाली निघत नसल्याने, मराठा समाजाने आता ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इंदापूर येथे पार पडलेल्या समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय असा ‘वनवास मोर्चा’ काढण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ‘ओबीसी’तून आरक्षणाची मागणी नजीकच्या काळात पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
इंदापूरमध्ये आज मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्याआतील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला ‘मराठा वनवास यात्रा’ नावाने संबोधले जाणार आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार आहे. तसेच आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर समाज बांधव ठाण मांडून बसणार आहे. तसेच याच ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे.
मराठा समाज येत्या ६ मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेणार आहे. याबाबतची घोषणा मराठा आरक्षण समन्वय समितीने केली आहे. मराठा आरक्षण समिती, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या परिषदेतून सरकारला शेवटचा इशारा देणार आहेत. मराठा समाज आता वनवास यात्रेतून न्याय मागणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी सांगितले. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर याचिकादेखील न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक झालेला आहे. दरम्यान, २२ एप्रिलला मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्यावतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला होता.
मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केल्याने राज्यात ओबीसीविरुद्ध मराठा समाज असा संघर्षही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओबीसी समाजाला राज्यात २७ टक्के आरक्षण आहे. त्यात जवळपास साडेसहाशे जाती आहेत. त्यात मराठा समाजासारखा मोठा समाज आला तर या समाजावर अन्याय होईल, अशी भीती त्यांना वाटते आहे. २७ टक्केपैकी भटक्या विमुक्त जाती-जमातींनादेखील ओबीसी कोट्यातूनच आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे मूळ ओबीसींना फक्त १९ टक्केच आरक्षण उरले आहे.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या
– आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये.
– अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे.
– सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा.
– मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
– पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा.
– कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी.
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणार्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात.
——————